‘त्या’ बिबट्याचे सुरक्षारक्षक सुरक्षेविना
By Admin | Updated: March 11, 2015 00:51 IST2015-03-11T00:51:47+5:302015-03-11T00:51:47+5:30
नरभक्षक ठरवून गडेगाव लाकूड आगार परिसरात बंदिस्त करण्यात आलेल्या बिबट्याच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले सुरक्षारक्षक सुरक्षेविना पहारा देत आहेत.

‘त्या’ बिबट्याचे सुरक्षारक्षक सुरक्षेविना
भंडारा : नरभक्षक ठरवून गडेगाव लाकूड आगार परिसरात बंदिस्त करण्यात आलेल्या बिबट्याच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले सुरक्षारक्षक सुरक्षेविना पहारा देत आहेत. या सुरक्षारक्षकांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे हे वनकर्मचारी भंगारात पडलेल्या एका वाहनाच्या टपात झोपून पहारा देत आहेत.
मागील पाच महिन्यांपासून साकोली वनक्षेत्रातील खांबा (जांभळी) येथे एका वृद्ध महिलेचा बळी घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर या बिबट्याला गडेगाव लाकूड आगारात एका लोखंडी पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. या बिबट्याच्या देखभालीसाठी सहा वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
या बिबट्याची सुरक्षा ज्या वनकर्मचाऱ्यावर आहे, ते भयग्रस्त वातावरणात काम करीत आहेत. या बिबट्याला ज्याठिकाणी ठेवण्यात आले आहे, तो परिसर जंगलव्याप्त आहे. या वनकर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी जागा नाही. परिणामी त्यांना भंगारात असलेल्या एका वाहनाच्या टपाला रात्रीचा निवारा करावा लागला आहे. या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्यामुळे या वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दोन वेळा द्यावे लागते मांस
या बंदीस्त बिबट्याला दोन वेळेस मांस द्यावे लागते. सकाळी अडीच किलो आणि सायंकाळी अडीच किलो असे दररोज पाच किलो मांस द्यावे लागत असून हा खर्च लाखावर पोहोचला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)