भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोहघाटा जंगलाजवळील जांभळी सडक शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनास्थळी वनाधिकाऱ्यांसह वैद्यकीय चमूने भेट दिली.
साकोली व लाखनी जंगल सीमेवर मोहघाटा जंगल असून या जंगलात मोठ्या प्रमाणात वाघ, बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांचा संचार असतो. याच मोहघाटा जंगलातून गतवर्षभरापासून अंडरपासचे बांधकाम सुरू आहे. जंगलातील वन्यप्राण्यांची सुरक्षित रहदारी व्हावी, या हेतूने याचे बांधकाम केले जात आहे. मात्र रस्ते अपघातात वन्य प्राण्यांचे बळी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. अशाच एका अपघातात रविवारी पहाटेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना एका बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
जांभळी नर्सरी येथे घडलेल्या या अपघातानंतर घटनास्थळी जिल्ह्यातील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या चमूने मृत बिबट्याचा पंचनामा केला. यावेळी वरिष्ठ वनाधिकारी यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक, निसर्गमित्र व कर्मचारी उपस्थित होते. उत्तरीय तपासणीनंतर जंगल शिवारातच बिबट्याच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. गत दोन वर्षांत राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघातात वन्यजीवांचे बळी जाण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.