गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे नियोजन लाखनी तालुक्यासाठी करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:33+5:302021-04-07T04:36:33+5:30
लाखनीः राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पापासून डाव्या कालव्यातून नवीन नहराचे नियोजन केल्यामुळे तसेच करचखेडा उपसासिंचन प्रकल्पापासून धान शेती ...

गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे नियोजन लाखनी तालुक्यासाठी करावे
लाखनीः राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पापासून डाव्या कालव्यातून नवीन नहराचे नियोजन केल्यामुळे तसेच करचखेडा उपसासिंचन प्रकल्पापासून धान शेती साठी नवीन कालवे तयार केल्याने लाखनी तालुक्यातील ७ हजार ५५३ हेक्टर आर शेती शेत्र व साकोली तालुक्यातील ८ हजार ३२० हेक्टर आर शेतीमध्ये सिंचन व्यवस्था करून शेतकऱ्यांना दुष्काळापासून वाचविता येणार आहे. बारमाही पाणी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यात मदत होणार असल्याचे निवेदन जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रणवीर भगत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख, आदींना दिले आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. शेतकरी बँकेकडून किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करतो उत्पन्न घेण्यास अडचणी येत असतात. केवळ आठ तास वीजपुरवठा केल्याने शेती पिकवण्यास अडचणी येतात विंधन विहिरी मुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. धान पिकाला लावलेली मजुरी,खत, बियाणे व इतर खर्चाचा विचार करता शेतकऱ्याला पुरेसे उत्पन्न मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. मुला मुलींचे शिक्षण व लग्नही करू शकत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ची घटना घडतांनी दिसून येत असल्याचे रणवीर भगत यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.
लाखनी तालुक्यातील गडेगाव, गोंडसावरी, सावरी, मुरमाडी (सावरी), लाखनी, लाखोरी, सालेभाटा, केसलवाडा (पवार), मोरगाव, पिंपळगाव (सडक), ह्या तलाठी साझ्यातील ३२ गावांना ७ हजार ५५३ हेक्टर आर शेती क्षेत्र नवीन नहराद्वारे सिंचन करता येणार आहे. साकोली तालुक्यातील ८ हजार ३२० हेक्टर आर शेती क्षेत्रातील १७ गावांना नवीन नहराचा लाभ होऊ शकतो असे निवेदनात भगत यांनी स्पष्ट केले आहे. तलावात नहराचे पाणी सोडल्यास शेतीला पाणी पुरवठा करता येईल. लाखनी व साकोली तालुक्यातील किन्ही, गडेगाव, रेंगेपार (कोठा), खुर्सिपार, लाखोरी, निलागोंदी, सालेभाटा, चिखलाबोडी, एकोडी, बाम्पेवाडा, उसगाव, चांदोरी, पिंडकेपार, घानोड येथील मोठ्या जलाशयात गोसेखुर्द नहराचे व उपसा सिंचनाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळेल.