सर्वपक्षीय नेत्यांची ‘आघाडी’

By Admin | Updated: July 25, 2016 00:40 IST2016-07-25T00:40:14+5:302016-07-25T00:40:14+5:30

राजकारणात कायम कुणीच कुणाचा शत्रू व मित्र राहत नाही. वेळ, काळ व प्रसंग पाहून आपले पत्ते उघड करावे लागतात.

Leaders of All-Party Leaders | सर्वपक्षीय नेत्यांची ‘आघाडी’

सर्वपक्षीय नेत्यांची ‘आघाडी’

तत्वप्रणालीला मुठमाती : निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समितीची
मोहन भोयर  तुमसर
राजकारणात कायम कुणीच कुणाचा शत्रू व मित्र राहत नाही. वेळ, काळ व प्रसंग पाहून आपले पत्ते उघड करावे लागतात. केंद्र व राज्यात भाजप, काँग्रेस, राकाँ व सेनेत विस्तव जात नाही. परंतु तुमसर - मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हातात हात घालून निवडणुक लढवित आहेत.
वरिष्ठांचे तसे निश्चितच निर्देश प्राप्त झाले असावेत. शनिवारी माजी केंद्रीय मंत्री तथा राकाँचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी तुमसरात काँग्रेसचे माजी नगरसेवकाच्या घरी नगरपरिषद व बाजार समितीच्या निवडणुकीबाबत बैठक घेतली.
तुमसर - मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल विदर्भात तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी कोट्यवधींची येथे उलाढाल होते. त्याहीपेक्षा तुमसर व मोहाडी तालुक्यातील ग्रामीण राजकारणावर अतिशय प्रभाव पाडणारी ही एकमेव संस्था आहे. प्रत्यक्ष पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक जरी होत नाही, परंतु प्रत्येक पक्ष येथे बाजार समितीवर आपल्या पक्षाचा कब्जा राहावा याकरिता पडद्यामागून हालचाली सुरु आहेत. वरिष्ठ नेत्यांनी तशा सूचना स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिल्या असल्याचे बोलले जात आहे.
येथे तीन आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. यात बळीराजा जनहीत पॅनल, शेतकरी आघाडी व स्वाभीमानी किसान आघाडी यांचा समावेश आहे. यातील पॅनलमध्ये भाजप - काँग्रेस - राष्ट्रवादी काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस - भाजप, शिवसेना - काँग्रेस अशी उमेदवारांनी युती केली आहे. येथे एका पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या प्रभावशाली व श्रीमंत उमेदवारांनाच आघाडीत स्थान देण्यात आले. राजकारणाचा नवीन पॅटर्न येथे सध्या दिसत आहे. तत्वप्रणालीला येथे मुठमाती देण्यात आली. प्रत्येक आघाडीतील त्या - त्या पक्षाचे वरिष्ठ नेते येथे मार्गदर्शकाची भूमिका पडद्यामागून बजावित आहेत, हे विशेष. अर्थकारणाला येथे गती प्राप्त झाली आहे.
एकूण मतदार
तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत १९ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. त्यात एकूण ३,८०९ मतदार आहेत. यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातून ११ संचालक (मतदार १२९०), ग्रामपंचायत गट चार, संचालक (मतदार १४२१), अडत्या-व्यापारी गट दोन (मतदार ६१७), हमाल-मापारी गट एक (मतदार ४०६), पणन (मतदार ७५), १९ संचालक पदाकरिता ७० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात सेवा सहकारी संस्था गटाकरिता ३८, ग्रामपंचायत गट १७, अडत्या -व्यापारी पाच, हमाल-मापारी सहा, पणन प्रक्रिया चार असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
निवडणूक
तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २१ आॅगस्ट रोजी मतदान पार पडणार असून २२ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. सात वर्षानंतर येथे बाजार समितीची निवडणूक होत आहे. सध्या मतदारात निरुत्साह दिसून येत आहे. कोट्यवधींची लढालाढ करून नफा कमविणाऱ्या समितीकडून शेतकऱ्यांना सोयीसुविधा पुरवित नसल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे. आलटून पालटून तेच ते सहकार क्षेत्रातील तथा पक्षांचे पदाधिकारी येथे निवडणूक लढवितात. या बाजार समितीचा प्रत्यक्ष राजकारणावर काय प्रभाव पडतो हा संशोधनाचा विषय आहे. केवळ राजकीय पदाधिकाऱ्यांचे पुनर्वसन करणारी संस्था अशी स्थिती आज बाजार समितीची झाली आहे.

ईश्वरदयाल पटले यांनी बाजार समितीचा चेहरामोहरा बदलविला होता. त्यापुढील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. ही खरी वस्तूस्थिती आहे. लोकप्रतिनिधींकडून निधी प्राप्त करून इमारतींचे जाळे तेवढे निर्माण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या तोंडाला येथे केवळ पाने पुसण्यात आली. ही निवडणूक केवळ व्यवसायीक झाली आहे. योग्य सक्षम संचालक निवडून येण्याची गरज आहे.
- गजानन लांजेवार
अध्यक्ष, तुमसर तालुका सरपंच संघटना

Web Title: Leaders of All-Party Leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.