शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्यांना हाकलून लावा
By Admin | Updated: June 28, 2015 00:45 IST2015-06-28T00:45:53+5:302015-06-28T00:45:53+5:30
केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसह देशातील जनतेशी खेळ करीत आहेत.

शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्यांना हाकलून लावा
धुसाळा येथे प्रचारसभा : धनंजय मुंडे यांचे आवाहन
आंधळगाव : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसह देशातील जनतेशी खेळ करीत आहेत. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही, त्यांना अजूनपर्यंत कर्जवाटप केलेले नाही, गोरगरीब जनतेला खोटे आश्वासन देऊन बँकेत बचत खाते उघडायला लावले, अशा सरकारला केवळ स्वत:चे अच्छे दिन आले आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असता धुसाळा व हरदोली येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री रमेश बंग, नागपूरचे शहर अध्यक्ष अजय पाटील, अतुल लोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुंडे म्हणाले, केंद्रात व राज्यात यांचे मंत्री घोटाळे व खोट्या पदव्या प्राप्त करून मंत्री बनले आहेत. आपला जिल्हा भातासाठी प्रसिद्ध आहे. मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या धानाला हमी भाव ठरविला नाही. हे सरकार शेतकरी - गोरगरीब जनतेचे नाही. तर उद्योगपतींचे आहे. अशांना आता जिल्ह्यातून बुरे दिन दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उमेदवार किरण अतकरी यांनी केले तर आभार पंचायत समितीचे उमेदवार राहुल वानखेडे यांनी केले. (वार्ताहर)