खुनाच्या तपासाकरिता एलसीबी पथक दाखल
By Admin | Updated: July 21, 2016 00:25 IST2016-07-21T00:25:50+5:302016-07-21T00:25:50+5:30
कोष्टी शेतशिवारातील युवकाच्या खुनाचे रहस्य अद्याप उलगढलेले नाही.

खुनाच्या तपासाकरिता एलसीबी पथक दाखल
चौकशी सुरुच : पाच दिवसानंतरही प्रगती नाही
तुमसर : कोष्टी शेतशिवारातील युवकाच्या खुनाचे रहस्य अद्याप उलगढलेले नाही. पाच दिवसानंतरही आरोपींचा सुगावा लागलेला नाही. दरम्यान खुनाच्या तपासाकरिता भंडाऱ्यावरून एलसीबी पथक येथे दाखल झाले.
विनोद अशोक धुर्वे (२८) रा.गांधी वॉर्ड, देव्हाडी याचा मृतदेह कोष्टी शेतशिवारातील विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळला होता. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तुमसर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी चार संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी पोलिसांनी केली. परंतु कोणत्याही निष्कषापर्यंत पोलीस पोहचले नाही. तुमसर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान भंडारा येथून गुन्हे अन्वेशन विभागाचे एक पथक चौकशीकरिता आले. आरोपींची शोध मोहीम त्यांनी राबविली आहे. चार संशयीतांना चौकशीनंतर तुमसर पोलिसांनी सोडले. या खुनाचे रहस्य उलगडण्याऐवजी ते वाढत आहे. येथे सुपारी देवून तर खुन केला नाही असा प्रश्न उपस्थित होते. आरोपींचा कोष्टी शेतशिवाराशी कोणते ‘कनेक्शन’ आहे, याची चाचपणी सुरु आहे. शेतशिवारातील मार्ग, विहिर, पुराव्यांचा अभाव यामुळे हा खुन थंड डोक्याने केल्याची शक्यता बळावली आहे. (तालुका प्रतिनिधी)
युवकाच्या खूनप्रकरणी अद्याप कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहोचले नाही. रिपोर्टची तपासणी सुरु आहे. संशयीतांची चौकशी करण्यात आली. गरज पडल्यास त्यांना परत बोलविण्यात येईल.
- विक्रम साळी
उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर