Layer the layers, but follow the rules | थरावर थर रचा, पण नियम पाळा

थरावर थर रचा, पण नियम पाळा

ठळक मुद्देनियमांकडे दुर्लक्ष : अपघाताची नोंद नाही, मात्र सुरक्षा साधनांचा अभाव, तरुणांमध्ये वाढते क्रेझ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उत्सवप्रिय भंडारा जिल्ह्यात वर्षभर विविध उत्सवाचे आयोजन केले जाते. जन्माष्टमी अर्थात कान्होबाच्या मुर्तीची स्थापना घरोघरी केली जाते. दोन दिवस उत्साहाला उधाण आलेले असते. अलीकडे दहीहंडीची क्रेझ तरुणात वाढू लागली आहे. उंच असलेली दहीहंडी फोडण्यासाठी चुरस दिसून येते. शहरात दोन ठिकाणी सार्वजनिक आणि काही शाळांमध्ये दहीहंडीचे आयोजन केले जाते. नियमांकडे दुर्लक्ष होत असले तरी कुठेही आतापर्यंत अपघात मात्र घडला नाही. सुरक्षा साधनांचा अभाव दिसत असला तरी मंडळांचे पदाधिकारी मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन करतांना दिसत आहे. पोलीसही यावर करडी नजर ठेवून असतात.
भंडारा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन केले जाते. परंतु मुंबईसारखे व्यापक स्वरुप अद्यापही येथील दहीहंडीला आले नाही. गांधी चौक, जलाराम चौक येथे गेल्या कित्येक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे. अलिकडे शहरानजीकच्या गणेशपूर येथेही व्यापक प्रमाणात दहीहंडी आयोजित केली जाते. लाखो रुपयांचे बक्षीस असलेली दहीहंडी फोडण्यासाठी गोंविदांचे पथक सज्ज असतात. लहान मुलांपासून तरुणापर्यंत थरावर थर रचतात. अनेकदा थर खचून किरकोळ अपघात होतात. परंतु आजपर्यंत कुणी गंभीर जखमी झाला नाही. गत काही वर्षाचा आढावा घेतला तर गांधी चौकातील दहीहांडीच्यावेळी झालेला गोंधळाचा प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार झाला नाही.

गणेशपूरमध्ये १ लाख ११ हजाराचे बक्षीस
भंडारा शहरात जलाराम मैदान आणि गणेशपूर परिसरात यंदा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशपूर येथे श्वास फाऊंडेशनच्या वतीने मिशन हायस्कूलच्या प्रांगणात दहीहंडी आयोजित आहे. त्यासाठी १ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. स्थानिक गोविंदा पथकानी बक्षीस जिंकण्याची जय्यत तयारी चालविली आहे. भंडारा येथील दहीहंडीला अद्यापही कार्पोरेट लुक आला नाही. धार्मिकतेच्या भावनेतूनच दहीहांडीचे आयोजन केले जाते. खेळीमेळीच्या वातावरणात दहीहंडीचा उत्सव पार पडतो. साधारणत: सहा थर रचले जातात. यासाठी श्वास फाऊंडेशनने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या असून पोलीस विभागाची रितसर परवानगी घेतली आहे. आता कोण दहीहंडी फोडतो याची उत्सुकता आहे

तीन वर्षात कुठेही अपघात नाही
भंडारा शहरासह जिल्ह्यात दहिहंडीचा उत्सव साजरा करताना गत तीन वर्षात कुठेही अपघात झाला नाही. मंडळाचे पदाधिकारी सर्व नियमांचे काटेकोर पालन करताना दिसतात.

दहीहंडीचा उत्सव साजरा करताना सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे. दहीहंडीसाठी सुरक्षीततेची नियमावली आहे. लहान मुलांना सर्वात वरचा थरावर नेणे टाळावे. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलीस लक्ष ठेवून राहणार आहेत.
- विश्वास नांगरे पाटील,
पोलीस आयुक्त.

भंडारा शहरात यंदा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जातात. साहसी क्रीडा प्रकार म्हणून दहीहंडीकडे बघीतले जाते. शहरात अद्यापपर्यंत कोणतीही दुर्घटना सुदैवाने घडली नाही.
- संजय कुंभलकर,
श्वास फाऊंडेशन, भंडारा

Web Title: Layer the layers, but follow the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.