आज उघडणार ‘लक्ष्मी’ची दारे!
By Admin | Updated: September 28, 2015 00:45 IST2015-09-28T00:45:23+5:302015-09-28T00:45:23+5:30
शासकीय सुट्टी असल्याने तीन दिवसांपासून बँकांचा आर्थिक व्यवहार बंद होता. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना ....

आज उघडणार ‘लक्ष्मी’ची दारे!
तीन दिवसांपासून बँक बंद : होणार कोट्यवधींची उलाढाल
भंडारा : शासकीय सुट्टी असल्याने तीन दिवसांपासून बँकांचा आर्थिक व्यवहार बंद होता. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना या सुट्ट्यांमुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. उद्या बँक उघडणार असल्याने ग्राहकांची एकच गर्दी सर्वच बँकांमध्ये बघायला मिळणार आहे. गर्दीचा फायदा घेणाऱ्यांपासून बँक ग्राहकांनी सावध राहण्याची गरज आहे.
शुक्रवारला बकरी ईद, नंतर चौथा शनिवार व रविवार अशा सलग तीन दिवसाच्या सुट्ट्या बँकांना लागून आल्या. बँकांसोबत अन्य संस्थांनाही या सुट्टी मिळाल्याने तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार ठप्प होता. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे बँक ग्राहकांना व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रसंगांना सामोरे जावे लागले. सर्व बँकांना सलग तीन सुट्टी असल्याने व्यापाऱ्यांकडील रोजची आर्थिक उलाढाल त्यांना स्वत:कडे व्यवस्था नसतानाही घरी जोखमीने ठेवावी लागली.
दुसरीकडे सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने बँक व अन्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी चांदी होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका सलग तीन दिवस बंद होत्या. सतत तीन दिवस बँक बंद राहणार असल्याने गुरूवारला बँकांचे कामकाज पूर्णवेळ चालले. तीन दिवसाच्या बंद नंतर सोमवारला बँका सुरू होत असल्याने संभाव्य गर्दी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात आर्थि व्यवहार होईल. गुरूवारपर्यंत जमा झालेले धनादेश मंगळवारी वटणार आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग व चेकने व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना पैशाचा तुटवडा येणार आहे. (शहर प्रतिनिधी)