बिजेपार : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सालेकसाच्या वतीने ग्राम कोटरा (बांध) येथे बिट बिजेपार व बिट तिरखेडीच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा आणि महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेला डॉ.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा शुभारंभ करण्यात आला.जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते, आ. संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अतिथी म्हणून मुख्य कार्यपालन अधिकारी गावडे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, पं.स. सभापती हिरालाल फाफनवाडे, जि.प. सदस्य लता दोनोडे, विजय टेकाम, दिलीप वाघमारे, सरपंच मीरा नाईक, खंडविकास अधिकारी वाय.एफ. मोटघरे, उपसरपंच संतोष चुटे, पोलीस पाटील सिध्दार्थ वासनिक, तंमुसचे अध्यक्ष राजकुमार बहेकार, सुकलाल राऊत, सरपंच नितू वालदे, सर्व ग्रा.पं. सदस्य आणि गावकरी उपस्थित होते. डॉ. एपीजी अब्दुल कलाम अमृत आहार योजनेमध्ये गरोदर माता व स्तनदा माता यांना दररोज २५ रूपये किमतीचे आहार अंगणवाडी केंद्रात महिलांना दिला जाणार आहे. यात सातवा महिना सुरू असलेल्या गरोदर मातांना बाळंतपणानंतर तीन महिने सकस आहार मिळणार आहे. यात व्हिटॅमिन, हिमोग्लोबिन भरपूर प्रमाणात मिळणारे आहार दिले जाणार आहे. याप्रसंगी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे म्हणाल्या, ही योजना भविष्यातील सृदृढ बालके तयार करण्यासाठी खूपच उपयोगी पडेल. हीच बालके उद्याचा भारत घडविणारे सुदृढ नागरिक बनतील व देश घडवतील. तसेच देशाचे रक्षणसुध्दा करतील, असे त्या म्हणाल्या. मुख्य कार्यपालन अधिकारी गावडे यांनीसुध्दा या योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. आ. संजय पुराम म्हणाले, आम्हाला आमच्या बालपणी सकस आहार पाहिजे त्या प्रमाणात मिळाले नाही. म्हणून आमच्या सरकारने महाराष्ट्राच्या काही निवडक जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवित आहे. आमच्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी व मोरगाव अर्जुनी या आदिवासीबहुल तालुक्यांत ही योजना राबविली जात आहे. परंतु यात कुठल्याही जाती-पातीचा भेदभाव न करता या तालुक्यातील सर्व महिलांना याचा लाभ मिळणार व त्यांचा फायदा सर्वांनी घ्यावे, असे आवाहन केले. या वेळी विविध अंगणवाडीच्या बालकलावंतांनी जनजागृतीपर नाटके, नृत्य सादर केले. संचालन बिजेपार बिटच्या आगणवाडी पर्यवेक्षिका पारवे यांनी केले. आभार मीरा मेश्राम यांनी मानले. महिला मेळाव्याला बिजेपार बिट व तिरखेडी बिटच्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस बहुसंख्येने हजर होत्या. मेळाव्यासाठी सीडीपीओ ललीता शहारे यांच्या नेतृत्वात पर्यवेक्षिका विमल मेंढे, तावाडे, नंदा पारवे, गंगा पंधरे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
अमृत आहार योजनेचा शुभारंभ
By admin | Updated: March 11, 2016 01:07 IST