पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार
By Admin | Updated: March 19, 2015 00:40 IST2015-03-19T00:40:28+5:302015-03-19T00:40:28+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच विहिरी व हातपंपाच्या पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे खेडेपार येथील जनतेला पाण्यासाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार
सालेभाटा : उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच विहिरी व हातपंपाच्या पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे खेडेपार येथील जनतेला पाण्यासाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे.
खेडेपार आदिवासीबहुल गाव आहे. या गावात सरकारी विहिरी दोन असून एक खासगी विहीर आहे. तर बौद्ध विहार परिसरात एक विहिर आहे. एका विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्याचप्रमाणे हातपंप सात आहेत.
खेडेपार डोंगराय भागात आहे. तद्वतच शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी व बोअरवेल्सची संख्या गावातील पाणी पुरवठ्यांचे स्रोतापेक्षा अधिक असून खोल आहेत. गावात सध्या नळ योजना अस्तित्वात नाही. काही बोअरवेलची पाण्याची पातळी खोलवर गेली अहे. प्रभू इनवाते यांचे घराशेजारील हातपंप नादुरुस्त आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
कडक उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडतील. हातपंपाची पाण्याची पातळी खोल जाण्याची दाट शक्यता आहे. गावालगत मोठे तलाव नाहीत. त्यामुळे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याचे संकेत दिसत आहे.
उन्हातान्हात महिला शेतावरील विहिरीचे पाणी आणून गरजा भागवितात. पुरुष मंडळीही सायकलने किंवा कावडीने पाणी आणण्यास मदत करीत आहे. शुद्ध पाण्यासाठी पन्नास लक्ष रुपये किमतीची योजना प्रस्तावित आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे योजनेला ग्रहण लागले आहे. खेडेपारवासीयांसाठी कायमस्वरुपी स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा स्रोतांची उपाययोजना करणे गरजेचे आहे. तद्वतच भीषण पाणी टंचाईतून मुक्ती मिळविण्यासाठी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी पावले उचलावी, अशी मागणी उपसरपंच शामराव गणवीर यांनी केली आहे. (वार्ताहर)