जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
By Admin | Updated: March 8, 2017 00:33 IST2017-03-08T00:33:13+5:302017-03-08T00:33:13+5:30
शहरात बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास अकाली पावसाने हजेरी लावली. सडा शिंपल्यागत पावसाचा शिडकावा झाला.

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
भंडारा : शहरात बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास अकाली पावसाने हजेरी लावली. सडा शिंपल्यागत पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर सकाळी १० वाजतापर्यंत वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दुपारला पुन्हा उन्ह नंतर गारवा असा उन्ह सावल्यांचा खेळ सुरू होता.
ढगाळ हवामानामुळे बागायतीत फळे पोखरणारी अळी, तुडतुडे, फुलपाखरांची संख्या वाढून पिकांना धोका वाढला आहे. धानावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे.
पालांदूर : दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरणाचे आच्छादन होते. आज दुपारी १२ च्या सुमारास वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा मोठ्या थेंबाचा पाऊस झाला. पाच ते दहा मिनिटांच्या अवकाळी पावसाने पालांदुरातील तालुकास्तरीय पशु मेळावा प्रभावित झाला. भंडारा शहरातही मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास तुरळक पाऊस बरसला.
विशेष म्हणजे आम्रवृक्षांना बहर आला असल्यामुळे या पावसाचा फटका काही प्रमाणात गावरान आंबा पिकांवर होऊ शकतो. बागायतदार, विटभट्या मालक अक्षर: घाबरले असून २१ फेब्रुवारी २०१४ ची गारपीटीची आठवण ताजी झाली. मऱ्हेगाव परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला. याचा फायदा अत्यल्प असून नुकसानच शक्य आहे. ढगाळ हवामानामुळे बागायतीत फळे पोखरणारी अळी, तुडतुडे, फुलपाखरांची संख्या वाढून पिकांना धोका वाढला आहे. धानाला तर खोडकिडीने जाम जखडले आहे. दिवाळीपासून पाण्याचा थेंब नव्हता.
चक्राकार वाऱ्याच्या दिशेने अवकाळी पावसाची शक्यता वाढली असून हप्ताभर अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. तापमानातही चढउतार सुरु असल्याने अवकाळीचा धोका वाढला आहे. हवामान खात्याने ४ मार्चपासूनच पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. शेतकरीही सावध होत कापणीला आलेला साहित्य घरी घेऊन जाण्याच्या स्थितीत असून काहींनी धान्य घरी पोहचते केले आहे. पाऊस कमी जास्त कोसळला तरी चालेल. परंतु गारपीट होऊ नये, अशी चर्चा शेतकरी वर्गात होऊ लागली आहे.आंब्याचा मोहर व लहान आंबे गळून पाण्याचा धोका वाढला आहे. जेवढ्या दिवस वातावरण आच्छादित राहील तेवढे दिवस शेतकऱ्यांचा जीवन टांगणीला असतो. होळी, रंगपंचमी नंतरच हवामानात सुधारणा होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)