अखेर पाऊस बरसला
By Admin | Updated: June 18, 2015 00:45 IST2015-06-18T00:45:09+5:302015-06-18T00:45:09+5:30
खरीप हंगामासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा देत पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी ...

अखेर पाऊस बरसला
शेतकऱ्यांचा जीव भांड्यात : कंट्रोल रूम झाली ‘आऊट आॅफ कंट्रोल’
गोंदिया : खरीप हंगामासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा देत पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. मंगळवारी संध्याकाळी गोंदियात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने बुधवारीही जिल्ह्यातील अनेक भागात बरसून वातावरण ओलेचिंब केले. त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात कुठे किती पाऊस पडला याची माहिती देणारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूम मात्र सध्या ‘आऊट आॅफ कंट्रोल’ असल्याचे बुधवारी दिसून आले. पावसाळ्याच्या दिवसात २४ तास या कंट्रोल रूममध्ये कर्मचाऱ्यांची ड्युटी लावून सतत सतर्क राहणे गरजेचे असते. मात्र तिथे कुणाचेही कंट्रोल नसल्याचे दिसून येत आहे. बुधवारी पावसाचे आकडे देणेही तिथे उपस्थित कर्मचाऱ्याला शक्य होत नव्हते. वारंवार दूरध्वनीवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्या कर्मचाऱ्याला आकडेच मिळत नसल्याचे लक्षात आले. जे आकडे शेवटी सांगण्यात आले ते सुद्धा खरे नसल्याचा प्रत्यय आला.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया तालुक्यात १५२.२ मिमी पाऊस पडला. मात्र ६५ पेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी नोंदविली जाते. परंतु ही सामान्य बाबसुद्धा तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांना माहीत नव्हती. त्यांना याबाबत सांगण्यात आल्यावर ते संबंधित अधिकाऱ्याला विचारण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी गोंदियात ३२ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्यांच्याजवळ आतापर्यंत किती पाऊस झाला याचीही नोंद नव्हती. रेकॉर्ड तपासून माहिती सांगू असे उत्तर देण्यात आले. पुन्हा तिथे उपस्थित कर्मचाऱ्याला निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली. मात्र सायंकाळपर्यंत त्यांच्याजवळ पाऊस किती झाला, याची माहिती उपलब्ध होवू शकली नाही.
शेवटी कृषी विभागाशी संपर्क केल्यावर पाऊस किती झाला याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे ही माहिती कंट्रोल रूममधून दोन्ही वेळा मिळालेल्या माहितीपेक्षा अगदी वेगळी होती. त्यामुळे कृषी विभागावर विश्वास ठेवायचा की जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूमच्या कर्मचाऱ्यांवर? याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
कृषी विभागाकडील पावसाची नोंद
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासात गोंदियात २१.५ मिमी, तिरोडा येथे ७.६ मिमी, गोरेगाव १४.१, आमगाव ४.३, सालेकसा ०, देवरी ०.६०, सडक-अर्जुनी १०.९ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३.७ मिमी पाऊस झाला आहे. २४ तासातील सरासरी पाऊस ७.८ मिमी आहे.
१ जूनपासून आतापर्यंत गोंदियात ५५.६ मिमी, तिरोडा येथे ७४.४ मिमी, गोरेगाव ६२.८, आमगाव येथे ३४.९, सालेकसा येथे ५५.२, देवरी येथे २९.३, सडक-अर्जुनी येथे २७.६ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ४८.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याची सरासरी ४८.६ मिमी आहे.
वातावरणात अजूनही उकाडा
मागील दोन दिवसांपासून गोंदिया शहरात पाऊस येत आहे. १६ जूनच्या सायंकाळी जोरात पाऊस आला. रात्रीलासुद्धा रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र १७ जून रोजी पुन्हा उन्हामुळे उकाडा कायम होता. नागरिक उष्णतेमुळे त्रस्त होते. गेल्या एका आठवडाभरापासून ऊन व उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत होता. परंतु बुधवारी पुन्हा उकाडा वाढला.