मंडईतील दंडारीला लागली अखेरची घरघर
By Admin | Updated: November 3, 2014 23:20 IST2014-11-03T23:20:56+5:302014-11-03T23:20:56+5:30
दिवाळीनंतर गावागावात मंडईच्या प्रसंगी होणारी विदर्भातील प्राचीन लोककला दंडारीला अखेरची घरघर लागली आहे .नुकत्याच सानगडी येथे झालेल्या मंडई उत्सवात नेहमी पेक्षा दंडार कलापथकाने

मंडईतील दंडारीला लागली अखेरची घरघर
पुरुषोत्तम डोमळे - सानगडी
दिवाळीनंतर गावागावात मंडईच्या प्रसंगी होणारी विदर्भातील प्राचीन लोककला दंडारीला अखेरची घरघर लागली आहे .नुकत्याच सानगडी येथे झालेल्या मंडई उत्सवात नेहमी पेक्षा दंडार कलापथकाने सहभाग न घेतल्याचे दिसून आले.
विदर्भात दिवाळीनंतर पाडव्यापासून गावागावात मंडई नावाचा लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या लोकोत्सवात दंडार ही लोककला प्रामुख्याने सादर केली जाते. त्यातील स्त्री वेषधारी पुरुषांच्या हातात टाळ घेवून ढोलकी व शाहीरी गाण्याच्या तालावर नाचणारा नाच आणि सोंग सगळ्यांना मंत्रमुग्ध करीत असते. आता स्त्री वेष धारण करणारी, सोंग धारण करणारी माणसे व मुले मिळेनासी झाल्याने मोठी परंपरा असलेली दंडार मागे पडत आहे. जुन्या ग्रामीण जनमाणसावर दंडारीचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे दंडार हा शब्द वाच्यार्थासोबत लक्ष्यार्थ आणि व्यंगार्थ घेवूनही पदोपदी कानावर पडत असतो. कारण गावातील अठरापगड जातीचा स्वेच्छा सहभाग दंडारीत दिसून येतो. दंडारीत सोंगाडे, नाचे, गाणारे, त्यांना साथ देणारे साथीदार, ढोलकी, तुणतुणेवाले, मेकपवाला, पडदेवाला अशी कामे करणारी मोठी जंत्रीच असते. मात्र आता ही जंत्री एकसंघ राहत नसल्याने वैभवशाली दंडारीला अवकळा आली आहे. पूर्वी दंडार म्हणजे गावाचे व मोहल्ल्याचे वैभव समजले जात असे. तिला पाटील, श्रीमंत, महाजनांचा मोठा गावाश्रय होता.
दिवाळीनंतर होणाऱ्या मंडई जलशात खडी दंडार प्रामुख्याने दाखविली जाते. दंडारीत गणानंतर खडे सोंग व झडत्या सुरु होतात. प्रत्येक सोंगानंतर लावणीसह नाच हा असतोच. खडे सोंग किंवा प्रसंग नाच आणि झडती अशा प्रमाणे दंडारीचा कार्यक्रम प्रेक्षकांची नाडी पकडून पुढे जात असते. ग्रामीण प्रेक्षकही कोणताच आडपडदा न ठेवता खद्खदून सअत असतात. परंतु आता दंडारीची प्रेक्षकांवरील पकडही विविध कारणावरून ढिली होत आहे. ही पकड कायम करण्यासाठी दंडारीचा पारंपारिक बंध सोडून आधुनिक टाईम मॅनेजमेंट दंडारकर्त्यांनी साधावे असा सल्लाही काही प्रेक्षक आता देत आहेत.
शासकीय स्तरावर या लोककलेची मोठी उपेक्षा असल्याने ही कला लुप्त होत आहे. विदर्भात दिवाळीनंतर सतत १५ दिवस मंडईच्या रुपगाने दंडार नाटकांचा जल्लोष असतो. मात्र या जल्लोषावरही आता भोंगा बंदीने विरजण घातले आहे.