पाणीपुरवठा योजनेला अखेरची घरघर
By Admin | Updated: June 8, 2015 01:08 IST2015-06-08T01:08:15+5:302015-06-08T01:08:15+5:30
कोंढा येथील पाणी पुरवठा योजनेला अखेरची घटका लागली असून नागरिकांना तीन दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. ठिकठिकाणी जलवाहिणी फुटलेली आहे.

पाणीपुरवठा योजनेला अखेरची घरघर
कोंढा कोसरा : कोंढा येथील पाणी पुरवठा योजनेला अखेरची घटका लागली असून नागरिकांना तीन दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. ठिकठिकाणी जलवाहिणी फुटलेली आहे. जलवाहिणी दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतच्या नाकीनऊ आले आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत आहे.
कोंढा हे सात ते आठ हजार लोकवस्तीचे मोठे गाव आहे. लोकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी ३० वर्षापूर्वी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली. गावाला या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या दरम्यान गावांची लोकसंख्या वाढली. पाण्याची कमतरता निर्माण झाली. बोअर मारून पाणी देण्याचा प्रयत्न झाला. लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने शासनाने लाखो रुपये तसेच ग्रामपंचायतचा लाखो रुपयाचा निधी खर्च झाला. पण पाण्याची समस्या जैसे थे आहे. (वार्ताहर)
मुख्य विहीर कोरडी, तळ्यातच नाही तर मळ्यात कशी येईल?
भंडारा - पवनी राज्यमार्गावर गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य विहीर आहे. सध्या ही विहीर पूर्ण कोरडी पडली आहे.चार- पाच दिवसातून विहिरीत पाणी जमा होते. या विहिरीवरून कोसरा गावाला देखील पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी मुख्य विहीर पूर्ण कोरडी पडली. कल्पना चावला अध्यापक विद्यालय जवळील पंप तसेच डॉ.विश्वास यांच्या घराजवळील पंप याद्वारे लोकांना पिण्याचे पाणी दिले जात होते. तरीदेखील पाण्याची समस्या सुटत नाही, असे लक्षात आल्यानंतर जीवन जिभकाटे यांच्या घराजवळ मे महिन्यात बोअर करून पंप तयार केले. तरी देखील कोंढा येथील पाणी समस्या सुटली नाही. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या आहे. येथील नळाला पिण्याचे पाणी येतच नाही. आले तर अत्यल्प. त्यामुळे या वॉर्डातील नागरिकांना शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. वॉर्ड क्रमांक ३ मधील महिलांनी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतवर अनेकदा घागर मोर्चा काढला. पण तळ्यातच नाही तर मळ्यात कशी येईल. या म्हणीप्रमाणे पाणीच नाही तर मिळेल कुठून? असा प्रश्न पडला आहे. मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्याने पुन्हा गावात पाणी समस्या वाढली आहे.
येथील नळयोजनेची जलवाहिणी जीर्ण झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी फुटते. दुरुस्तीच्या नावावर लाखो रुपये ग्रामप्रशासनाचे रुपये खर्च होत आहे. एक मोटरपंप खरेदी करण्यााठी पदाधिकारी भंडारा, नागपूर येत जात आहे. पण पिण्याच्या पाणी समस्येवर तोडगा निघू शकत नाही. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोंढा गावाची पाणी समस्या हा मुख्य विषय राहणार आहे. सामान्य जनता मात्र पिण्याचे पाणीसाठी भटकत आहे. सध्या तीन दिवसातून पाणी मिळत आहे. ही समस्या दूर होण्याची वाट गावकरी पाहत आहे.