भूखंड माफियाचा शेतमालकावर हल्ला
By Admin | Updated: June 16, 2015 00:37 IST2015-06-16T00:37:06+5:302015-06-16T00:37:06+5:30
शेती विक्रीचा मॅग्नम कंपनीसोबत केलेल्या करारनाम्यानुसार पैसे दिले नाही.

भूखंड माफियाचा शेतमालकावर हल्ला
भोजापूर येथील घटना : गुन्हे दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ
भंडारा : शेती विक्रीचा मॅग्नम कंपनीसोबत केलेल्या करारनाम्यानुसार पैसे दिले नाही. त्यामुळे नागरिकांना भूखंड न घेण्याचे आवाहन केले असता भूखंडमाफियाने गुंडांना पाठवून हल्ला केला. याची पोलिसात तक्रार नोंदवून पोलिसांनी गुन्हे दाखल केले नसल्याचा आरोप प्रविण बांते यांनी पत्रपरिषदेत केला.
यावेळी मारहाण झालेले महादेव लोंढूजी बांते, गणपत लोंढूजी बांते, उर्मिला प्रदीप बांते, छाया विजय बांते, वनिता राजाराम बांते उपस्थित होते.
कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याची माहिती देताना प्रविण बांते म्हणाले, आमच्या तीन कुटूंबियांची पाच एकर जमिन मिलिंद घोगरे, रा.नागपूर यांना ५५ लाख रूपये एकराप्रमाणे विकण्याचे तीन करारनामे दि. १२ आॅगस्ट २०१३ रोजी केले. करारनाम्याच्यावेळी २० टक्के रक्कम दिली. डिसेंबर २०१४ मध्ये ३० टक्के रक्क्म घ्यावयाची होती. मिलिंद घोगरे यांनी मॅग्नम कंपनीच्या नावाने बयानपत्राच्या आधारे तिन्ही जमिन एकत्रित करून तहसीलदारांकडून ३० नोव्हेंबर २०१३ रोजी जमीन अकृषक केली. त्यानुसार मिलिंद घोगरे यांना डिसेंबर महिन्यात ३० टक्के रक्क्म देण्याची मागणी केली असता भूखंड विकून पैसे देणार असल्याचे सांगितले. परंतु, तसे करुन दिले नाही. त्यामुळे आम्ही या भूखंडाचा कुणीही सौदा करू नये, यासाठी ले-आउटच्या ठिकाणी फलक लावला. त्यामुळे चिडून जावून मिलिंद घोगरे यांनी गुंडाकरवी आमच्या कुटुंबियावर हल्ला केल्याचा आरोपही बांते कुटुंबियांनी केला. (जिल्हा प्रतिनिधी)
‘त्या’ पोलिसांना निलंबित करा - एकापुरे
शेतकऱ्यांना अधिकचे पैसे देण्याचे आमिष देऊन भूखंडासाठी शेती विकत घेणे, त्यानंतर पैसे देण्यासाठी टाळाटाळ करणे हा भूखंडमाफियांचा धंदा बनला आहे. बांते कुटूंबियांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल न करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी विहींपचे जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे यांनी केली.
पोलिसांची भूमिका संशयास्पद - श्यामकुंवर
पोलिसांनी कारवाईत दिरंगाई केली असून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले नाही. फिर्यादींची एमएलसी केली नाही. याप्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेध श्यामकुंवर यांना दिला आहे.