भूमी अधिग्रहण बिल शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे

By Admin | Updated: April 23, 2015 00:17 IST2015-04-23T00:17:24+5:302015-04-23T00:17:24+5:30

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने भूमी अधिग्रहण नामक वटहुकूम काढला आहे.

Land Acquisition Bill Destroying Farmers | भूमी अधिग्रहण बिल शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे

भूमी अधिग्रहण बिल शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे

पत्रपरिषद : विजय वडेट्टीवार यांचा आरोप, मोर्चा काढणार
भंडारा : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने भूमी अधिग्रहण नामक वटहुकूम काढला आहे. यात औद्योगिक कॉरीडोअरच्या नावाखाली उद्योगपतींना भरभराटीचे दिवस तर शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. भूमी अधिग्रहण बिल, एपीएल धारकांना धान्य, धानाला भाव, ऊसाचे चुकारे यासह अन्य ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने दि. ७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार तथा भंडारा जिल्हा प्रभारी विजय वडेट्टीवार यांनी दिली. आज सकाळी ११.३० वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते.
यावेळी माजी आमदार बंडूभाऊ सावरबांधे, आनंदराव वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे,काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, सीमा भुरे, प्रमिला कुटे यासह अन्य उपस्थित होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाने भूमी अधिग्रहण कायदा बिल आणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. असे बिल आणायचे असल्यास ८० टक्के शेतकऱ्यांची सहमती असणे आवश्यक आहे, मात्र तसे झाले नाही. फक्त उद्योगपतींचा फायदा दृष्टीसमोर ठेवून वटहुकूम काढण्यात आला आहे. मागील वर्षी शासनाने धानाला २०० रुपये बोनस व प्रत्येकी दोन हेक्टरी प्रमाणे मदत दिली होती. मात्र यावर्षी आवाज बुलंद करणाऱ्या शासनाचा आवाज कुठेतरी हरपला आहे. विभागाचे खासदार बोलत नाही. एकेकाळी धानाच्या मुद्यावर रान माजविणारे खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी उचलून धरली.
शासनाच्या नवीन धोरणानुसार एपीएल धारकांना धान्य मिळत नाही. रॉकेलचा कोट्यातही कपात करण्यात आली आहे. गोसेखुर्दसाठी लढणारे नेते जिल्ह्यातून गायब झाले आहेत. गोसेखुर्दच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेची कामे रखडली आहेत.
ऊस उत्पादकांना अजूनही चुकारे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या पाल्यांची लग्नपत्रिका दाखविल्याखेरीज चुकारे मिळत नसल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दि. ७ मे रोजी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री बाळाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे करणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्री व अमरावती येथे जाहीर सभेत नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या विधानाबाबत विजय वडेट्टीवार यांनी निषेध नोंदविला. पत्रपरिषदेचे संचालन व आभार जिया पटेल यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Land Acquisition Bill Destroying Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.