महिलांनी रोखले रेती वाहतुकीचे ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:58 IST2017-11-24T23:57:45+5:302017-11-24T23:58:20+5:30
मोहाडी तालुक्यातील मुंढरी रेतीघाटाचा लिलाव होऊन याच गावातील रस्ता वाहतुकीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.

महिलांनी रोखले रेती वाहतुकीचे ट्रक
आॅनलाईन लोकमत
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील मुंढरी रेतीघाटाचा लिलाव होऊन याच गावातील रस्ता वाहतुकीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, लिलावधारकांनी अटी, शर्ती व करारनाम्याचा भंग करीत कान्हळगाव हद्दीतून उपसा व वाहतूक करीत आहेत. प्रशासनाची परवानगी न घेता रेती साठवणुकीसाठी शासकीय जागेचा वापर करीत आहे. यासाठी नर्सरीतील झाडाच्या कत्तली करण्यात आल्याचा आरोप करीत कान्हळगाव येथील महिलांनी शेकडो ट्रक शुक्रवारला सकाळी रोखून धरले.
कान्हळगाव येथील महिलांनी रेतीचा अवैध उपसा व वाहतुकी विरोधात आंदोलन करीत कान्हळगाव हद्दीतील रस्ता रोखून धरल्याने कान्हळगाव येथे ट्रकांच्या रांगा लागलेल्या होत्या. सकाळपासूनच महिलांनी एकही ट्रक गावातून व गावाच्या हद्दीतून जावू दिला नाही. शासकीय जागेच्या वापर करण्यासाठी मनाई केली. नर्सरीतील झाडांची नुकसानभरपाई करा, अशी मागणी महसुल व पोलीस विभागाच्या अधिकाºयांना केली. पंरतू दुपारपर्यंत महसुल विभागातूक कुणी आंदोलनस्थळी पोहचले नाही. करडी पोलिसांनी भेट दिली. मात्र, प्रकरण महसुल विभागाच्या अधिकारातील असल्याचे सांगून आपण तोडगा काढू शकत नसल्याचे सांगत पोलिसांनी काढता पाय घेतला. त्यामुळे आंदोलकांनी लिलावधारकांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप करीत असंतोष व्यक्त केला.
रेतीच्या ट्रकांची वाहतूक व शासकीय जागेचा वापर करण्यासाठी मनाई केल्यानंतर वैनगंगा नदीपासून कान्हळगाव पर्यंत ट्रकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. मंढरी ते खडकी रस्त्यावरही ट्रक उभे करण्यात आल्याने वाहतुकीला कमालीचा अडथळा निर्माण झाला होता.
मुंढरी (बुज.) व्यतिरिक्त कान्हळगाव नदीतून रेतीचा अवैध उपसा होत आहे. करारनाम्यानुसार अर्धा मीटर रेतीचे उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली असताना दोन मीटरपर्यंत अवैध उपसा होत आहे. नदीतून रेती काढून शासकीय जागेतून वाहतूक करीत साठवणूक करण्यासाठी परवानगी घेण्यात आली नाही.
साठवणूक केलेली रेती दोन पोकलँड मशीनच्या सहायाने उपसा करीत आहे. या गैरप्रकारामुळे कान्हळगाव येथील वाहतुकीच्या रस्त्याची दुरावस्था होत असून शेतीचेही नुकसान होत आहे.
गुरूवारला रात्री १० वाजतापर्यंत रेतीघाटाची पाहणी केली. डंपीगसाठी एका जागेचा एनए केलेला आहे. मात्र, त्या शेजारील शासकीय जागेचा अनधिकृत वापर होत असल्याने अकृषक दंडाची आकारणी केली जाईल. मुंढरी घाटाच्या करारनाम्यात वाहतुकीसाठी त्याच गावातील रस्ता प्रस्तावित करण्यात आला असून त्याच रस्त्याचा वापर व्हायला हवा. तशा सूचना लिलावधारकांना दिले आहेत. ट्रक अडवून धरल्याची माहिती कुणीही दिली नाही. करडीचे ठाणेदारांनी आंदोलन होण्याची माहिती दिली. कान्हळगाव येथील महिलांनी ट्रक अडवून धरले असल्यास याची माहिती वरिष्ठांना देण्यात येईल.
- सूर्यकांत पाटील, तहसीलदार मोहाडी.