महिलांनो, आत्मनिर्भर व्हा
By Admin | Updated: March 10, 2016 00:53 IST2016-03-10T00:53:40+5:302016-03-10T00:53:40+5:30
महिला राष्ट्रशक्तीची जननी आहे. महिलांचा सन्मान महिलांच्याच कार्यकुशलतेने पुढे येऊ शकते. यासाठी स्वत:चे स्वाभिमान राखताना...

महिलांनो, आत्मनिर्भर व्हा
तोषिका पटले : राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान
आमगाव : महिला राष्ट्रशक्तीची जननी आहे. महिलांचा सन्मान महिलांच्याच कार्यकुशलतेने पुढे येऊ शकते. यासाठी स्वत:चे स्वाभिमान राखताना दुसऱ्यालाही त्याचे सन्मान देण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांनी दुर्बलतेचा कलंक पुसून आता निर्भय होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्राध्यापिका तोषिका पटले यांनी केले.
गोंदिया जिल्हा तालुका पत्रकार असोसिएशन व ल.भा. अध्यापक विद्यालय आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या.
अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक बी.एन. औटी, उद्बोधक म्हणून प्राध्यापिका तोशिका पटले, डॉ. रेणुका जनईकर, प्राचार्य डॉ.डी.के. संघरी, ए.यू. सज्जल, पत्रकार संघाचे अध्यक्ष पालकराम वालदे, सचिव राजीव फुंडे, रितेश अग्रवाल, नरेंद्र कावळे, यशवंत मानकर मंचावर उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावत्रीबाई फुले व लक्ष्मणराव मानकर यांच्या तैलचित्रावर पुष्पांजली वाहून दीप प्रज्वलानाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्राध्यापिका पटले पुढे म्हणाल्या, पुरुषप्रधान विकृत मानसिकतेपुढे महिलांना मुक्तसंचार करण्यासाठी पायबंद घालण्यात येत आहेत. या बंधनाचा विरोध व्हायलाच पाहिजे. वयोवृद्ध महिला व बालिकांवरील अत्याचार भारतीय संस्कृतीचा ऱ्हास करीत आहे. महिलांनी शिक्षित होऊन शौर्य दाखविल्याशिवाय त्यांचे सबलीकरण होणार नाही. स्वत:ला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, असे मत त्यांनी या वेळी केले.
याप्रसंगी डॉ. रेणुका जनईकर यांनी, महिलांनी कौटुंबिक व्यवस्थेच्या पलिकडे जाण्याचे धाडस अद्यापही स्वीकारले नाही. त्यामुळे चूल आणि मूल या विचाराच्या पलिकडे जाता आले नाही. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी विश्वास निर्माण करता आले नाही. मुलींना संपविणारी माता जगाच्या पातळीवर संपण्याच्या मार्गावर आहे. अस्तित्व निर्माण करण्याऐवजी संपविण्याची धाडसी वृत्ती ती कुशीत जपत आहे. ही महिलांसाठी शोकांतिका आहे. शिक्षण व सुदृढ शरीराशिवाय शौर्य मिळणार नाही. महिलांनी स्वत:ला जपण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक बी.एन. औटी यांनी, महिलांनी अत्याचाराला जोपासू नये. अत्याचाराचा विरोध करण्याचे धाडस निर्माण करावे. संकुचित विचारांना सोडून योग्य निर्णय घेण्याची क्षमता बाळगण्याची आवश्यकता आहे. स्वत:च्या विचारांना बंधन घालू नये, मुक्त संचार करून आत्मविश्वास पुढे करावे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात डॉ.डी.के. संघी, पालकराम वालदे यांनीही समायोचित मत व्यक्त केले. प्रास्ताविक यशवंत मानकर यांनी केले.
संचालन ज्योती बिसेन, सत्यशीला बिसेन यांनी केले. आभार नरेंद्र कावळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्या काकडे, निकिता कावळे, हरीश खरकाटे, निखिल कोसरकर, दीक्षा काकडे, खापर्डे, रमेश चुटे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
महिला सन्मानाचे मानकरी
महिला सन्मान कार्यक्रमात ज्योती लखन खोटेले यांना सामाजिक कार्यासाठी, डॉ. रेणुका जनईकर यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा, सुषमा तुलसीदास भुजाडे, पद्मा क्रिष्णा चुटे, निर्मला रामटेके यांना शासकीय प्रतिनिधी व विकास दूत म्हणून, पुष्पा सोयाम यांना आदिवासी महिलांचे प्रबोधन तसेच प्राचार्य ए.ए. सज्जल यांना शिक्षण कार्यातील दखल याबद्दल आयोजकांनी अतिथींच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.