महिला रुग्णालयासाठी जागेचा अभाव
By Admin | Updated: August 14, 2015 00:07 IST2015-08-14T00:07:55+5:302015-08-14T00:07:55+5:30
शहरात स्वतंत्र महिला व विशेष बाल रुग्णालय मंजुर होवून आज तब्बल अडीच वर्षाचा काळ लोटला आहे.

महिला रुग्णालयासाठी जागेचा अभाव
भंडारा : शहरात स्वतंत्र महिला व विशेष बाल रुग्णालय मंजुर होवून आज तब्बल अडीच वर्षाचा काळ लोटला आहे. प्रशासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी उपोषण केले होते. उपोषण सोडविण्यासाठी पालक मंत्री हे स्वत: उपोषण मंडपाला भेट देवून १५ आॅगस्टपर्यंत प्रस्तावित रुग्णालयासाठी जाता उपलब्ध करुन देवू असे आश्वासन दिले होते. पंरतु तीन महिने लोटूनही बांधकामासाठी जागा शोधता आली नाही, ही शोकांतिका असल्याचे मत जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रविण उदापुरे यांनी व्यक्त केले आहे.
शासन जनस्वास्थ्यासाठी अनेक योजना राबविते. पंरतु योजना लालफिताशहीमध्येच अडकत आहे. असा आरोप प्रविण उदापुरे यांनी केले आहे. शासनाच्या आरोग्य समितीचा सदस्य या नात्याने महिला रुग्णालयाच्या जागेसंदर्भात गेल्या दोन वर्षापासून मी पाठपुरावा घेत आहे. पंरतु जिल्हा प्रशासन या बाबतीत गंभीर भूमिका घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
भंडारा जिल्हयात महिला स्वास्थ्य व विशेषत: गर्भवती मातांचा प्रश्न अत्यंत बिकट आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय ४०० खाटांचे असून २०० च्या वर खाटा प्रसुती व महिलांच्या आजारासाठी वापरण्यात येतात. जागा उपलब्ध नसल्यामुळे परिणामी महिलांना खालीच जमिनीवर झोपण्यास बाध्य केले जाते. डॉक्टरांच्या कमतरतेचा विपरीत परिणाम होवून जिल्हा सामान्य रुग्णालयात सिझरचा प्रमाण आयपीएचएस स्टँडर्ड नुसार ५ ते १५ टक्के असतांना ४३ ते ४८ टक्के सिझर केल्या जात आहेत.
वर्ष २०१३-१४ हया वर्षात एकूण ७३८४ प्रसुतीपैकी ३२२४ प्रसुती सिझरीयनने झाल्या. वर्ष २०१४-१५ मध्ये एकूण प्रसुती ८०८० झाल्या. त्यापैकी ३६२४ म्हणजे ४४.८१ टक्के प्रसुती सिझेरीयनने झाल्या आहेत. याबाबत समितीच्या बैठकीत वारंवार आक्षेप नोंदविण्यात आलेले आहेत. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या २५ जागा रिक्त आहेत. तसेच परिचारिकांसह ४४ जागा रिक्त असल्याची माहिती आहे.
त्यामुळे महिला रुगणांकडे दुर्लक्ष होत असते. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसुतीसाठी येत असलेल्या ७५ ते ८० टक्के महिला ‘अॅनेमीक’ म्हणजे शरिरात रक्ताची कमी या आजाराने गसित असतात. त्यातच डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे प्रकृती जास्तच बिघडल्याने ‘रेफर टू नागपूर’ केले जात असते. किंवा सिझेरियन आॅपरेशनचा घातक निर्णय जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनास घ्यावा लागत आहे.
मागील दोन वर्षात १० महिलांचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाल्याची नों द खुद्द आरोग्य विभागाने केली आहे. ही आकडेवारी म्हणजे एक गंभीर बाब असल्याचे प्रविण उदापुरे यांनी म्हटले आहे.
भंडारा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे स्वत: आरोग्य मंत्री आहेत. तेव्हा जागा उपलब्धतेकडे त्यांनी जातीचे लक्ष घालावे. प्रशासनिक अधिकाऱ्यांना जागा उपलब्धतेसंदर्भात कामाला लावले असते तर ५ एकर जागा सहज उपलब्ध झाली असती, मात्र तसे झाले नाही.
महिला रुग्णालयाच्या संदर्भात खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी धीरजकुमार व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २६ जुलैला विशेष बैठक झाली. त्यात उपरोक्त मुद्यांवर विस्तृत चर्चा झाली. परंतू कागदी घोडे मधातच लटकले असल्याची खंत आहे. पालकमंत्री डॉ. सावंत यांनी निर्णय घेवून १५ आॅगस्टला ध्वजारोहणानिमित्त जागा अधिग्रहणाची घोषणा करावी अशी मागणी उदापुरे यांनी निवेदनातून केली आहे. (नगर प्रतिनधी)