लाखनी : तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांत तपासणी करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. योग्य उपचाराअभावी व सोयी-सुविधा उपलब्ध झाली नसल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात काही डॉक्टरांच्या अज्ञानी उपचारामुळे तडफडत अनेक रुग्णांना भंडारा, नागपूरला जावे लागत आहे.
तालुक्यात प्रशासनातर्फे समर्थ महाविद्यालयाच्या भगिनी निवेदिता वसतिगृहात कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. यथे ६० खाटांची व्यवस्था केली आहे. परंतु, तेथे ऑक्सिजनची उपलब्धता नाही. लाखनी येथे ऑक्सिजनची सोय केली तर तालुक्यातील रुग्णांना प्राण गमवावे लागणार नाहीत. तालुक्यात लाखनी व पालांदूर (चौ.) येथे ग्रामीण रुग्णालय आहेत. मुरमाडी (तुपकर), केसलवाडा (वाघ), पिंपळगाव (सडक), सालेभाटा, पोहरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. लाखोरी, राजेगाव, शिवनी येथे आयुर्वेदिक दवाखाने आहेत. राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे चालणाऱ्या दवाखान्यात कोविड रुग्णांवर उपचार करणे गरजेचे आहे. पुरेशा सुविधेअभावी ही रुग्णालय ओपीडीपुरते मर्यादित आहेत.
तालुक्यातील २२ गावांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील किन्ही (गडेगाव), मुरमाडी (सावरी), सिपेवाडा, गराडा, चिखलाबोडी, दिघोरी /नान्होरी, आलेसुर, पोहरा, मासलमेटा, लाखोरी, मचारना, नान्होरी, बोरगाव, सोमलवाडा, मेंढा (पोहरा), घोडेझरी, वाकल, मेंढा /भुगाव ,पिंपळगाव (सडक), चिचटोला, रेंगेपार (कोहळी), लाखनी येथील क्षेत्र प्रतिबंधित केले आहे. प्रत्येक गावात रुग्णसंख्या वाढत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बॉक्स
ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी लाखनी तहसीलदारांचा पुढाकार
तालुक्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी ऑक्सिजनचे रिकामे जम्बो सिलिंडर फॅब्रिकेशन व्यापाऱ्यांकडून उपलब्ध करून देण्याकरिता संदीप भांडारकर, सचिन घाटबांधे, करण व्यास, प्रणय शामकुवर या तरुणांनी पुढाकार घेतला आहे. तहसीलदार मल्लिक विरानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून वाढीव ऑक्सिजन सिलिंडरबाबत चर्चा केली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही व सर्वांवर योग्य निदान करून उपचार केले जाणार असल्याचे तहसीलदार मल्लिक विरानी यांनी सांगितले आहे.