बालोद्यान परिसरात स्वच्छतेचा अभाव.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:37 IST2021-09-03T04:37:05+5:302021-09-03T04:37:05+5:30
पवनी : शहरातील गौतम वॉर्डातील बालोद्यानाचे निर्मितीसाठी नगर परिषद प्रशासनाने लक्षावधी रुपये खर्च केले. बालोद्यान रम्य व आकर्षक असल्याने ...

बालोद्यान परिसरात स्वच्छतेचा अभाव.
पवनी : शहरातील गौतम वॉर्डातील बालोद्यानाचे निर्मितीसाठी नगर परिषद प्रशासनाने लक्षावधी रुपये खर्च केले. बालोद्यान रम्य व आकर्षक असल्याने बालोद्यानात फेरफटका मारण्यासाठी परिसरातील शेकडो आबालवृद्ध संध्याकाळी आवर्जून हजेरी लावतात. बालोद्यान आत रम्य असले तरी बाहेर मात्र गुरांना बांधून ठेवले जात असल्याने स्वच्छतेचा अभाव असल्याचे जाणवते.
नगर परिषद प्रशासनाचा कारभार प्रभारी मुख्याधिकारी यांचे खांद्यावर आहे. त्यामुळे गावातील कित्येक समस्या दुर्लक्षित आहेत. पालिकेच्या महत्त्वाच्या पदावर अधिकारी व कर्मचारी नाहीत. गेली अनेक वर्षे पद रिक्त आहे. नगरात फेरफटका मारून समस्या समजून घेणारी यंत्रणा कार्यरत नाही. गावात चौफेर अवैध बांधकाम सुरू आहे. रस्त्यावर बांधकाम साहित्य विखुरलेल्या स्थितीत असल्याने रहदारीला अडथळा होत आहे. रस्त्यापासून नियमानुसार पार्किंगसाठी जागा न सोडता बांधकाम सुरू आहे. रस्त्यावर गुरे-ढोरे बांधली जात आहेत. अस्वच्छता राहात असल्याने नगरात मच्छरांचे प्रजनन वाढले आहे. हिवताप, डेंग्यू अशा आजाराला पोषक वातावरण मिळाले आहे. नागरिकांना शिस्त लावणारे मुख्याधिकारी पवनीत असावे, अशी मागणी वारंवार केली जात आहे. पण दुर्दैवाने पवनीकरांचे मागणीला जिल्हा प्रशासन केराची टोपली दाखवून शासनाकडे पाठपुरावा करीत नाही, त्यामुळे समस्या वाढत आहेत. बालोद्यान असो वा चौक असे कित्येक ठिकाणांचे निरीक्षण करून उपाययोजना करण्याची गरज आहे. पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे एवढीच अपेक्षा नागरिकांना आहे.
020921\img_20210902_064510.jpg
ताडेश्वर वार्ड, खापरी नाका परिसरातील बालोद्यानाचे अवतीभवती चा अस्वच्छ परिसर.