ज्ञान रचनावादाची घडी बदल्यांमुळे विस्कटणार
By Admin | Updated: June 3, 2016 00:33 IST2016-06-03T00:33:32+5:302016-06-03T00:33:32+5:30
प्राथमिक शाळांच्या अध्यापनात नव्या पर्वाला सुरुवात झाली. ज्ञानरचनावाद अध्यापनाने शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केली.

ज्ञान रचनावादाची घडी बदल्यांमुळे विस्कटणार
आज कार्यशाळा : आता शिक्षकांच्या तालुकास्तरीय बदल्या
राजू बांते मोहाडी
प्राथमिक शाळांच्या अध्यापनात नव्या पर्वाला सुरुवात झाली. ज्ञानरचनावाद अध्यापनाने शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केली. ज्ञानरचनावादाची मुळे खोलवर रूजण्याचे कार्य होत असताना मधातच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आता प्रशासकीय व विनंती बदल्या तालुकास्तरीय केल्या जाणार आहेत. या बदल्यांचा परिणाम ज्ञानरचनावादाच्या अध्यापनावर होणार आहे.
जिल्हास्तरावर प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय विनंती, आपसी बदल्या जिल्हा परिषदेकडून करण्यात आल्या आहेत. आता तालुकास्तरावर प्रशासकीय व विनंती करण्यासंबंधी कार्यशाळा होत आहेत. प्रत्येक तालुक्यातून प्राथमिक शिक्षक प्रशासकीय बदलीने दूर गेले. शाळांचे स्थान बदल झाले. या बदलाचा परिणाम अध्यापनाच्या कार्यक्षमतेवर पडणार आहे.
शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी ज्ञानरचनावाद ही संकल्पना आखली गेली. निराशमय अध्यापन पद्धतीत बदल होऊन आनंद देणारी शिक्षण प्रणाली रुढ व्हायला लागली.
शिक्षकांनी नव्या ज्ञानरचनावादी अध्यापनाचा पुरस्कार केला. मोठ्या आनंदाने, चैतन्याने फुलून गेलेला प्राथमिक शिक्षक नव्या दमाने ज्ञानरचनावादाची संकल्पना वास्तवात उतरायला लागला होता. काही शिक्षकांची बदली मनाविरुद्ध झाली असेल असे शिक्षक पुरते खचले आहेत. ज्ञानरचनावाद अध्यापनाची मुळे दृढ करायला सुदृढ मानसिकतेची आवश्यकता असते. अशा खचलेल्या शिक्षकांच्या मानसिकतेला मजबूत करण्यासाठी समुपदेशनाची गरज भासणार आहे.
मोहाडी तालुक्यातून ५९ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा बदली झाली. तेवढेच शिक्षक तालुक्यात आले आहेत. मोहाडी तालुक्यात १९ पदे पदवीधरांची रिक्त आहेत. ७ रिक्त पदे उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची आहेत. तालुकास्तरावर प्रशासकीय बदल्या ३२ होणार आहेत. तर विनंती बदल्या १६ करण्यात येणार आहेत. पांढराबोडी, सिरसोली, कांद्री, हिवरा, नवेगाव, पिंपळगाव, सकरला, शिवनी, मुंढरी खुर्द, निलज खुर्द, नवेगाव बु., ढिवरवाडा, जांभोरा, धुसाळा, बेटाळा, मोहगाव व बोथली या शाळांमध्ये ६ ते ८ वीच्या वर्गावर प्रशासकीय बदलीने ७ पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. मोहाडी शिक्षण विभागाची बदलीची कार्यशाळा ३ जून रोजी पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे.
प्राथमिक शिक्षणात अधिक सुत्रबद्धता यावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यासंबंधी नवीन धोरण आखले पाहिजे.
- हरिश्चंद्र बंधाटे, सभापती, पं.स. मोहाडी.
स्थानांतरणामुळे ज्ञानरचनावादाच्या प्रक्रियेवर काहीअंशी परिणाम होईल. प्रभावी संप्रेषण व सामाजिक समायोजनाची प्रक्रिया मंदावणार आहे. त्याचा परिणाम गुणवत्ता वाढीवर होऊ शकतो.
- विनायक मोथारकर, शिक्षक, जि.प. प्राथमिक शाळा, खापा.