किडीने धान बनले तणस
By Admin | Updated: November 7, 2015 00:25 IST2015-11-07T00:25:12+5:302015-11-07T00:25:12+5:30
कर्ज काढून महागडी बियाणे खरेदी केली. पेरणी केली, महागडी खते घेतली. हातात होते नव्हते ते सगळे शेतीत झोकून देवून...

किडीने धान बनले तणस
नुकसानभरपाईची मागणी : शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट
मोहदुरा : कर्ज काढून महागडी बियाणे खरेदी केली. पेरणी केली, महागडी खते घेतली. हातात होते नव्हते ते सगळे शेतीत झोकून देवून मोठ्या मेहनतीने शेतकरी शेती कसण्याच्या कामाला लागला होता. यावर्षी धान्य भरभराटीने होऊन लावलेला पैसा निघून उरलेले पैसे मुलाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, घरकुटुंब चालविण्यासाठी शिल्लक राहतील अशी आशा शेतकऱ्यांची होती. परंतु निसर्गाने यावर्षी त्या शेतकऱ्याच्या आशा पूर्णत: धुळीस मिळविले. ऐन धान कापणीच्या तोंडावर रोगाने त्या शेतकऱ्यांचे तोंडचे घास हिसकावले. किडीच्या प्रादुर्भावाने दोन एकरातील धान पुर्णत: फस्त केले असून धान तर एकही दिसत नाही दिसत आहे फक्त तणीस.
मोहदुरा येथील गोपीचंद नारायण खेत्रे यांनी शेतात महागडी बियाणे घेऊन दोन एकरात धान लावले होते. सुरुवातीला धान चांगले होते परंतु यावर्षी सगळीकडे धानावर करपा या रोगाने अक्षरश: धुमाकुळ घातला आणि त्याचा फटका या शेतकऱ्याच्या धानावर सुद्धा पडला. रोगाच्या प्रादुर्भावाने या शेतकऱ्याच्या शेतातील धान पुर्णत: किडीने खाल्ले असून धानाची तणीस बनली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात संकट ओढावले असून काढलेले कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शेतकरी पडला आहे. शेतकऱ्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घेऊन नुकसान भरपाईची मागणी या शेतकऱ्यानी केली आहे. (वार्ताहर)