खरीप गेले, रबीवरही संकट
By Admin | Updated: November 2, 2014 22:28 IST2014-11-02T22:28:15+5:302014-11-02T22:28:15+5:30
सुरूवातीपासूनच खरीप हंगाम धोक्याचा व चिंतेचा राहणार, असे भाकित वर्तविले जात असतानाच धानाला मिळत असलेल्या अत्यल्प भावामुळे खरच शेती परवडतेय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खरीप गेले, रबीवरही संकट
सिंचन सुविधेचा अभाव : अत्यल्प पावसामुळे ओलितावरच भिस्त
भंडारा : सुरूवातीपासूनच खरीप हंगाम धोक्याचा व चिंतेचा राहणार, असे भाकित वर्तविले जात असतानाच धानाला मिळत असलेल्या अत्यल्प भावामुळे खरच शेती परवडतेय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जगाचा पोशिंदा स्वत: उपाशी, अशी वेळ आली आहे.
दुबार-तिबार पेरणीने व कपाशी पिकाला आतापर्यंत तसेच उलंगवाडीपर्यंत येणारा खर्च, त्यातच मिळणारे कमी उत्पादन पाहता खरच हा भाव कापूस उत्पादक शेतकऱ्याला तारक ठरणार काय, हा प्रश्नच आहे. यावरून शासन शेतकऱ्यांच्या समस्यांकडे खरेच लक्ष देते काय, हे दिसून येते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आत्मसन्मान, हरिहरी नोट शेतकऱ्यांच्या खिशात दिसेल, असे स्वप्न दाखवून मताचा जोगवा मागून झोळी भरून घेण्यात आली. ते बळीराज्य आणल्याचा आव आणणारे शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी धानाला मिळत असलेल्या अत्यल्प भाव चिंतेत भर टाकणारा ठरत आहे.
पाटचाऱ्या नेस्तनाबूत
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून पाटबंधारे विभागामार्फत प्रकल्पाच्या कालवे, उपकालव्यांतून पाटचऱ्या काढल्या जातात. जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या पाटचऱ्या नेस्तनाबूत झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोयही उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या जलसाठ्यात बऱ्यापैकी पाणी असले तरी कालवे, पाटचऱ्या सदोष असल्याने शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पाणीच पोहोचत नसल्याचे दिसते. अनेक पाटचऱ्या फुटल्या असून अनेक ठिकाणी कचरा साचलेला आहे. याकडे लक्ष देत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमीच असलेल्या यातना यंदाच्या हंगामातही जैसे थेच आहेत. बाजारातही योग्य भाव मिळत नाही. दुबार-तिबार पेरणीनंतर तुरळक का होईना धान आले; पण ढगाळ वातावरणाने आलेला तोंडचा घास हिरावला. यंदाचा खरीप हंगामही शेतकऱ्यांचा काळजीतच गेला. मध्यंतरी दुष्काळसदृश्य परिस्थिती होती. पोळ्यानंतर चांगला पाऊस झाल्याने पिके तरली; परतीचा पाऊस आला नाही. आकस्मिक संकटात आलेली दिवाळी शेतकऱ्यांची खरी परीक्षा घेणारी ठरली. यावर्षी पाऊस व मान्सून तब्बल एक महिना उशीरा आला. यामुळे शेतकऱ्यांची पेरणी उशीराच झाली. शिवाय दुबार-तिबार पेरणीचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागला. सर्वच पिके यंदा उशीरा येत असल्याने रबी पिकांचेही नियोजन बिघडणार असल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे रबी हंगामातूनही काही हाती लागेल की नाही, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. आजपर्यंत दिवाळीपूर्वी वा लगेच रबी हंगामातील हरबरा व अन्य पिकांची पेरणी होत होती. परिसरात पुरेसा पाऊन न आल्याने यंदाही रबी हंगामावर विपरीत परिणाम होणार असल्याची चिन्हे आहेत. आधीच खरिपाने साथ सोडली. निसर्गाच्या लहरीपणा आड आल्याने जलपातळी वाढली असली तरी जमिनीत पाणी मुरले नाही. खरिपात पिकले नाही तर रबीवर भिस्त असते; पण पाऊस व्यवस्थित न झाल्याने रबी हंगामावरही संकटच येणार असल्याची चिन्हे आहेत. सिंचनाची सोय न झाल्यास अनेक कोरडवाहु शेती असलेले शेतकरी रबी हंगामालाही मुकणार असल्याचेच दिसते. यंदा पाऊस उशिराने आला. शिवाय परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांना रबी हंगामात पिके घेता येणार असली तरी कोरडवाहु शेतजमीन असलेले शेतकरी विवंचनेत दिसतात. खरिपाने दगा दिला, पिके हातची गेली, आता रबी हंगामाचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. निसर्गाने दगा दिल्यास अकारण खर्च होईल, या विचाराने शेतकरी रबी हंगामातील पेरणी करण्यास धजावत नसल्याचे दिसते. गहू, मका, हरबरा आदी पिकांसाठी पाण्याची गरज असते.प्रकल्पांतून पाणी मिळणेही गरजेचे झाले आहे. (शहर प्रतिनिधी)