रॉकेलचा टँकर पेट्रोल पंपावर !

By Admin | Updated: July 20, 2016 00:31 IST2016-07-20T00:31:07+5:302016-07-20T00:31:07+5:30

आपल्या वाहनातील पेट्रोल शुद्ध आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर सावधान! जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपांमध्ये रॉकेलमिश्रित पेट्रोल मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Kerosene tanker on petrol pump! | रॉकेलचा टँकर पेट्रोल पंपावर !

रॉकेलचा टँकर पेट्रोल पंपावर !

रंगेहाथ पकडले : तहसीलदाराची कारवाई, चौघांना अटक
अर्जुनी (मोरगाव) : आपल्या वाहनातील पेट्रोल शुद्ध आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर सावधान! जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपांमध्ये रॉकेलमिश्रित पेट्रोल मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असाच एक प्रयत्न अर्जुनीच्या तहसीलदारांच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात यश आले. सार्वजनिक वितरण प्रणालीतील रॉकेलचा टँकर चक्क पेट्रोल पंपावर नेऊन तिथे रॉकेल काढताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.
तहसीलदार सिद्धार्थ भंडारे यांनी शनिवारी रात्री १०.३० वाजतादरम्यान ही कारवाई केली. या धडक कारवाईमुळे अवैधपणे रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तहसीलदार भंडारे शनिवारी (दि.१६) रात्री तहसील कार्यालयाच्या आपली व्यवस्थापन नियंत्रण कक्षात बसले होते. त्यावेळी रात्री ९.३० च्या सुमारास सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रॉकेलचा पुरवठा करणारा ट्रक (एम.एच.३५, के १२२९) तहसील कार्यालयात पोहोचला. कागदपत्रांची तपासणी करुन तहसीलदारांनी त्यावर टँकर जमा करण्याची वेळ नमूद केली. या टँकरमध्ये १२ हजार लीटर केरोसीन असल्याची नोंद कागदपत्रात होती. हा टँकर तहसील कार्यालयात उभा करण्यास सांगण्यात आले. काम आटोपल्यानंतर तहसीलदार नियंत्रण कक्षातून बाहेर पडले, तेव्हा टँकर तहसील कार्यालयात दिसला नाही. तहसीलदारांनी कोतवाल शरद रामटेके व गृहरक्षक संजय पटले यांच्या मदतीने टँकरचा शोध घेतला. तेव्हा तो टँकर तहसील कार्यालयासमोरील त्रिमुर्ती पेट्रोल पंपावर उभा असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी रात्री १०.३० वाजता त्या पेट्रोल पंपावर धडक दिली. त्यावेळी टँकरचालक सम्मदअली अब्बासअली सय्यद व त्याचा मदतनीस शहाबाज हैदाअली सय्यद रा.गोंदिया हे टँकरच्या नोजलमधून एका बादलीत केरोसीन काढताना दिसले. त्यांच्या बाजूला पेट्रोल पंपावर काम करणारे माणिक श्रीराम कापगते रा.लेंडेझरी व तुकाराम मनोहर वलथरे रा.पिंपळगाव हे कॅन घेऊन उभे होते. एकंदरीत टँकरमधीेल केरोसीन काढून चोरीने पेट्रोल पंपावरील कामगारांना विकत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तहसीलदारांनी लगेच तलाठी सुरेखा हरिणखेडे यांना बोलावले. अंदाजे १५ लीटर रॉकेल भरलेली बादली व एक रिकामी प्लास्टीक कॅन तेथून जप्त केली. पंचनामा करून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी आरोपी अम्मदअली अब्बासअली, शहाबाज हैदरअली सय्यद, माणिक श्रीराम कापगते व तुकाराम मनोहर वलथरे यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३, ७ तसेच कलम ३७९, ४११, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला. हे रॉकेल नेमके कशासाठी काढले जात होते याविषयी तपासातून उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. एखाद्या पेट्रोल पंपावर रॉकेलचा टँकर लावून त्यातील रॉकेल काढण्याएवढी हिंमत कर्मचारी करू शकतात का? अशी चर्चा सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kerosene tanker on petrol pump!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.