जिल्ह्याची प्रतिमा अबाधित ठेवा
By Admin | Updated: March 26, 2015 00:28 IST2015-03-26T00:28:29+5:302015-03-26T00:28:29+5:30
सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्याचे चांगले व वाईट दोन्ही फायदे आहेत.

जिल्ह्याची प्रतिमा अबाधित ठेवा
भंडारा : सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्याचे चांगले व वाईट दोन्ही फायदे आहेत. त्यामुळे या माध्यमाचा वापर जपुन केला पाहिजे. जिल्ह्याची प्रतिमा डागाळली जाईल, असे कोणतेही कृत्य सोशल मिडियाच्या वापरातून करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.
सण-उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कयम राहावी म्हणून जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. खोडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे, अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, कार्यकारी अभियंता गाणार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, तहसिलदार सुशांत बनसोडे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती निंबोरकर, महेंद्र गडकरी, डॉ. जुल्फी शेख, राम चाचेर उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक व शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी सोशल मिडियांचा वापराबाबत जनजागृती करण्यात येईल. मात्र पालकांनी सुद्धा याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना समाजाला, राज्याला आणि राष्ट्राला धोका होणार नाही, अशा पद्धतीने करायला पाहिजे. प्रत्येकाने स्वत:च्या धर्माला चांगले समजावे पण दुसऱ्याच्या धर्माला व जातीला कमी लेखू नका. प्रसारमाध्यांनी सुद्धा घटनेच्या दोन्ही बाजू द्याव्यात, शांतता राखण्यासाठी प्रशासनाने काय काम केले ते सुद्धा लोकांपर्यंत पोहचायला हवे, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कणसे म्हणाले, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ हे रद्द केल्याने सोशल मिडियाचा वापर करणाऱ्यांना खुप आनंद झाला असेल. पण या स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही त्याला बंधन घातली गेली पाहिजेत. त्यासाठी आय.पी.सी. अॅक्ट आहे. या कायद्यानुसार सुद्धा संबंधितावर कार्यवाही करता येवू शकते. जिल्ह्याची ओळख खैरलांजी, मुरमाडी, अशी झाली आहे. ती बदलण्याचे आवाहन आपल्यासमोर असताना आपण बेजबाबदारपणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले. अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांनी जातीय सलोखा समितीची भूमिका विषद केली तर उपविभागीय अधिकारी हिम्मत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)
समितीच्या सदस्यांनी मांडले विचार
बैठकीत राम चाचेरे यांनी सोशल मिडियावर विस्फोटक मजकुर टाकू नये. पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे आणि मिरवणुकांमध्ये डी.जे. ऐवजी ढोल ताशाचा वापर करावा अशा सूचना केल्यात. प्रा. डॉ. जुल्फी शेख यांनी सायबर क्राईम विषयी तरूणांना संस्कार देण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. हाजी अब्दुल गफ्फार आकबानी यांनी दुसऱ्यांच्या जाती, धर्माचा सन्मान करायला हवा. इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. तसेच कायदा हातात न घेता पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. महेंद्र गडकरी, ज्योती निंभोरकर यांनीही सुचना केल्यात.