करडी परिसराला १६ तास भारनियमनाचा ‘शॉक’

By Admin | Updated: August 1, 2016 00:18 IST2016-08-01T00:18:08+5:302016-08-01T00:18:08+5:30

करडी परिसरातील शेतकरी व घरगुती ग्राहक करडी फिडरवरून होणाऱ्या १६ तासाच्या भारनियमनाने पावसाळा असतानाही होरपळून निघाले आहे.

Kardi area gets 'shock' for 16 hours | करडी परिसराला १६ तास भारनियमनाचा ‘शॉक’

करडी परिसराला १६ तास भारनियमनाचा ‘शॉक’

शेतकऱ्यांमध्ये संताप : करडी, आंधळगांव परिसरातील शेतकऱ्यांचा उपकेंद्रावर आंदोलनाचा इशारा
करडी (पालोरा) : करडी परिसरातील शेतकरी व घरगुती ग्राहक करडी फिडरवरून होणाऱ्या १६ तासाच्या भारनियमनाने पावसाळा असतानाही होरपळून निघाले आहे.
मागील १० दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. रोवणीसाठी तसेच रोवणी झालेल्या धान पिकाला जगवायचे कसे? केव्हाही घरगुती वीज बंद करून १० ते १२ तासांचे भारनियमन होत आहे. उकाड्यामुळे दिवसा व रात्रीची झोपही विभागाने उडवली आहे. हे भारनियमन त्वरीत बंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
विदर्भात विजेचे मोठे उत्पादन होत असताना भारनियमनाचा त्रास येथील शेतकऱ्यांसह व्यवसायीकांना होत आहे. करडी फिडरवर १६ तासांचे भारनियमन होत आहे. परिसरातील २५ गावांना तसेच कोका परिसरातील पाच गावांना माडगी फिडरवरून करडी उपकेंद्राच्या माध्यमातून विजेचा पुरवठा केला जात आहे. कोका परिसरातील गावे कोका वन्यजीव अभयारण्यात मोडतात.
जंगली श्वापदांचा वावर या भागात आहे. मात्र विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे येथील नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. मुख्यालयी राहावे की नाही असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. घरगुती ग्राहक १० ते १२ तास होणाऱ्या घोषित व अघोषित भारनियमनाने त्रस्त आहेत. मात्र विजेचे बील कमी झालेले दिसत नसल्याने त्यांच्या असंतोषात भर पडली आहे.
करडी व कोका परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याला विद्युत विभागाची मोठी भूमिका असल्याचा आरोप होत आहे. फक्त आठ तासात विद्युत विभागानेच शेती पिकवून दाखवावी, असा शेतकऱ्यांचा संतप्त प्रश्न आहे.
मागील १० दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. रोवणी झालेल्या शेतात भेगा पडायला लागल्या आहेत. शेतीसाठी घेतलेले कर्ज पुन्हा मागील वर्षासारखे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने व विद्युत विभागाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. रोवणी झालेल्या शेतकऱ्यांबरोबर रोवणी न झालेले शेतकरीही बेजार झाले आहेत.
शेतीची धूळधाणी झाली असून रात्रीची झोपही विभागाने उडविली आहे. रात्री केव्हाही वीज पुरवठा बंद केला जातो. पावसाळ्याचे दिवस असल्याने मच्छरांचा उपद्व्यापामुळे लहान मुले आजारी पडत आहेत. भारनियमणामुळे त्यांना झोप येत नसल्याने रात्र जाणून निघत आहे. केव्हाही वीज पुरवठा बंद करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर कायम केला जातो. असह्य झाल्याचे नागरिकांचे मत असून त्वरीत भारनियमन बंद न केल्यास करडी उपकेंद्रावर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)

आंधळगाव परिसरात २४ तास वीज पुरवठ्याची मागणी
आंधळगाव : परिसरात धान रोवणीचा हंगाम सुरु असून पाऊस वारंवार हुलकावणी देत आहे. शेतकरी दररोज दमदार पाऊस पडेल या आशेने वरुण राजाकडे टक लावून बघत आहेत. त्यातच या परिसरात भारनियमण सुरु असल्यामुळे फक्त शेतकऱ्यांना आठ तास शेत ओलीत करता येते. हे लोडशेडींग न करता २४ तास वीज पुरवठा करण्याची मागणी आंधळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता, महावितरण कंपनीच्या अभियंत्याला केली आहे.शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा या उद्देशाने शासन अनेक योजना राबवित आहे. तर दुसरीकडे शासनच लोडशेडींग करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. आंधळगाव परिसरात भात रोवणी जोमात सुरु आहे. मात्र वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना फक्त आठ तास वीज पुरवठा करीता पाण्याची आवश्यकता आहे. शेतात पाणी नसल्यामुळे मजुरांना खाली ठेवून मजुरी भरून द्यावी लागत आहे. मात्र वीज वितरण कंपनी रात्र पाळीला वीज पुरवठा सुरु करते. तेवढ्या रात्री विद्युत पंप सुरु करण्यासाठी जाणे शेतकऱ्यांना अवघड होते असते. त्यात रात्रीला वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांवर हल्ला करण्याची शक्यता असते व त्या शेतकऱ्याला जीवास मुकावे लागू शकते. या सर्व गोष्टींचा वीज वितरण कंपनी व शासनाने विचार करून शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन अभियंता वीज वितरण कंपनी यांना शेतकऱ्यांनी दिले आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कैलास मते, नरेंद्र बुराडे, रेवराम उपरीकर, अमोल विठुले, आत्माराम पिकलमुंडे, श्रीराम गलबले, सेवक मते, पंढरी उके, प्रफुल धुमनखेडे, नरेंद्र धुमनखेडे, उमेश बनकर, जनार्दन गोंडाणे, पांडूरंग मते, शिवलाल गलबले आदी शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)

करडी परिसरात विद्युत विभागाचे वतीने कृषी फिडरवर १६ तासाचे तर घरगुती फिडरवर १० ते १२ तासांचे घोषित, अघोषित भारनियमन केले जात आहे. माडगी विद्युत स्टेशन जळाल्याचे कारण देत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरून टाकले जात आहे. शेतकरी त्रस्त असून त्वरीत भारनियमन बंद न झाल्यास करडी उपकेंद्रावर शेतकऱ्यांचे वतीने आंदोलन केले जाईल.
- श्रीकांत डोरले,
सामाजिक कार्यकर्ता तथा शेतकरी करडी
माडगी फिडरला आग लागल्यामुळे विजेचे संकट उभे ठाकले आहे. शासनाच्या धोरणामुळे कृषीवर १६ तासाचे भारनियमन तर घरगुतीवरही ८ तासांचे भारनियमन होत आहे. माडगी केंद्र दोन दिवसात सुरु होण्याची शक्यता आहे. त्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. मे महिन्यात वारंवार बिघाड आल्याने वीज पुरवठा खंडीत होत होता. आता मात्र दुरुस्त्या पूर्ण केल्या आहेत.
ए. बी कहाले उपविभागीय अभियंता मोहाडी

Web Title: Kardi area gets 'shock' for 16 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.