कापगते विद्यालयाची पूनम जिल्ह्यात प्रथम
By Admin | Updated: June 14, 2017 00:11 IST2017-06-14T00:11:36+5:302017-06-14T00:11:36+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे दहावीचा निकाल घोषित केला.

कापगते विद्यालयाची पूनम जिल्ह्यात प्रथम
जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८५.०३ टक्के : नागपूर विभागात भंडारा द्वितीय क्रमांकावर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे दहावीचा निकाल घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८५.०३ इतका लागला. साकोली येथील नंदलाल पाटील कापगते विद्यालयाची विद्यार्थीनी पुनम प्रमोद रोहणकर या विद्यार्थीनीने ९८ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. तिला ५०० पैकी ४९० गुण मिळाले असून कला व क्रीडा क्षेत्रातील सहभागामुळे तिला अतिरिक्त १० गुण मिळाले आहेत.
द्वितीय क्रमांकावर भंडारा येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचा विद्यार्थी चिन्मय अनिल नवलाखे याने प्राप्त केला. त्याला ५०० पैकी ४८४ गुण आहेत. यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. एकूण १९ हजार ४२५ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या निकालाची टक्केवारी स८१.३८ असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ८८.७९ इतकी आहे. ही टक्केवारी ७.४१ ने अधिक आहे.
मुलींचीच भरारी
यावर्षीही निकालात मुलांना पिछाडीवर टाकत मुलींनी आघाडीची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्यातून सातही तालुके मिळून १६ हजार ५१८ विद्यार्थी उतीर्ण झाले. यापैकी ८ हजार १६ मुले तर ८ हजार ५०२ मुली उर्तीर्ण झाल्या. बारावीच्या परीक्षेतही मुलांपेक्षा मुलींनी आघाडी घेतली होती.
तालुकानिहाय ऊत्तीर्ण विद्यार्थी
१८ हजार ५१८ उतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये भंडारा तालुक्यातून ४,२६८ पैकी ३,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखांदूर तालुक्यातून २,२०७ पैकी १,९२३ विद्यार्थी, लाखनी तालुक्यातून १,६११ पैकी १,४३३ विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातून २,३६८ पैकी १,९६५ विद्यार्थी, पवनी तालुक्यातून २,६९६ पैकी २,१८७ विद्यार्थी, साकोली तालुक्यातून २,६७७ पैकी २,२९६ विद्यार्थी तर तुमसर तालुक्यातून ३,५९८ पैकी ३,०३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
१९ शाळांचा निकाल १०० टक्के
जिल्ह्यात दहावीच्या निकालात एकूण १९ शाळांनी शंभर टक्के निकाल दिला आहे. यात जेसीस इंग्लिश हायस्कूल भंडारा, साईराम हायस्कूल परसोडी(ता.भंडारा), एस.एस.सारडा महिला समाज माध्यमिक विद्यालय भंडारा, अनुसूचित जाती व नवबुद्ध मुलांची शासकीय शाळा, प्राईड कॉन्व्हेंट शाळा भंडारा, युनायटेड कॉन्व्हेंट ठाणा (जवाहरनगर), विद्याविहार मंदिर लाखांदूर, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मासळ ता. लाखांदूर, हायसेंथ लिटिल फ्लॉवर हायस्कूल गडेगाव (लाखनी), जिल्हा परिषद हायस्कूल पोहरा, गांधी विद्यालय विरली खंदार ता.पवनी, प्रबुद्ध हायस्कूल कन्हाळगाव ता. पवनी, नॅशनल उर्दू हायस्कूल पवनी, पवन पब्लिक स्कूल पवनी, कृष्णमुरारी कटकवार इंग्लीश हायस्कूल साकोली, एम दिक्षित माध्यमिक विद्यालय आलेसूर ता. तुमसर, सावित्रीबाई मेमोरियल हायस्कूल गोबरवाही ता.तुमसर, सेंट जॉन मिशन इंग्लीश मिडियम हायस्कूल तुमसर, मातोश्री विद्यामंदिर विनोबा नगर तुमसर या शाळांचा समावेश आहे.
दोन आठवड्यांपूर्वी घोषित करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा नागपूर विभागातून प्रथम क्रमांकावर होता. दहावीच्या निकालात मात्र जिल्ह्याला द्वितीय प्राप्त झाले आहे. बेस्ट आॅफ फाईव्हच्या निकषावर लागलेल्या निकालामुळे विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी तथा कला व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीमुळे मिळालेल्या गुणांचे आधारे टक्केवारी काढली जाते.
संजय साठवणे ।
दहावीच्या परिक्षेत प्रथम आलेल्या पुनमला मेकॅनिकल इंजिनिअर बनण्याची इच्छा आहे. आई-वडिलांचा आशिर्वाद व गुरूजणांच्या मार्गदर्शंामुळेच हे यश लाभल्याची प्रतिक्रीया तिने भ्रमणध्वनीवर दिली. दररोज नऊ तास अभ्यास व नियमित सराव करायची असे तिने सांगितले. पुनमचे वडील प्रमोद रोहणकर हे नंदलाल पाटील कापगते विद्यालयात शिक्षक तर आई वर्षा या गृहीणी आहेत. पुनम ही कुटुंबासोबत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे गेली आहे. शाळेचे प्राचार्य गोमासे व शिक्षकवृदांनी तिचे कौतुक केले आहे.