उत्सवात सर्वधर्म समभाव जोपासा
By Admin | Updated: August 29, 2016 00:23 IST2016-08-29T00:23:28+5:302016-08-29T00:23:28+5:30
येणाऱ्या दिवसात पोळा, गणपती, ईद यासारखे अनेक उत्सव येणार असून सण साजरे करताना...

उत्सवात सर्वधर्म समभाव जोपासा
शांतता सभा : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे प्रतिपादन
मोहाडी : येणाऱ्या दिवसात पोळा, गणपती, ईद यासारखे अनेक उत्सव येणार असून सण साजरे करताना सर्व व्यक्तींनी एकोप्याने व सर्वधर्म समभावाने हे सण साजरे करावे. यातून नवा आदर्श स्थापित करावा असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी मोहाडी पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता समिती सभेत व्यक्त केले.
या सभेला अध्यक्ष म्हणून तहसीलदार धनंजय देशमुख उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुहास चौधरी, ओमप्रकाश गेडाम उपस्थित होते. याप्रसंगी गणपती उत्सवात कोणकोणती काळजी घ्यावी, तसेच विसर्जन सायंकाळी सात वाजेपूर्वी करण्यात यावे, विसर्जनाच्या वेळी मंडळाच्या सदस्यांना ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून बाहेरच्या व्यक्तीची ओळख होईल व अप्रिय घटना घडणार नाही. डी.जे. लावण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या. तहसीलदार धनंजय देशमुख यांनी एक गाव एक गणपतीची संकल्पना सांगून त्याचे फायदे सांगितले. तसेच उत्सव आनंदाने व गुण्यागोविंदाने साजरे करण्याचे आवाहन केले. सभेला विलास वाडीभस्मे, यशवंत थोटे, सिराज शेख, विनोद नंदनवार, जितेंद्र सोनकुसरे, नईम कुरैशी, बबलू शेख, वामन बोकडे, तंमुस अध्यक्ष सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील जामा मस्जीद कमेटीचे सदस्य उपस्थित होते. संचालन व आभार पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम यांनी केले. (शहर प्रतिनिधी)