‘कॅशलेस’च्या नावावर दूध उत्पादकांची थट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 00:58 IST2017-01-01T00:58:51+5:302017-01-01T00:58:51+5:30
जिल्ह्यातील दुध उत्पादक व शेतकऱ्यांचा कणा असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक असून या बँकेला पाहिजे तसा पैसा पुरविला जात नाही.

‘कॅशलेस’च्या नावावर दूध उत्पादकांची थट्टा
सुनिल फुंडे यांचा आरोप : भंडाऱ्यात दुग्ध उत्पादकांचा मेळावा
भंडारा : जिल्ह्यातील दुध उत्पादक व शेतकऱ्यांचा कणा असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक असून या बँकेला पाहिजे तसा पैसा पुरविला जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व दुध उत्पादक त्रस्त झाले असून ‘कॅशलेस’च्या नावावर जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा चालवित असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केला.
सहनिबंधक सहकारी संस्थेच्या निर्देशानुसार जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाने ३० डिसेंबर रोजी कॅशलेस व्यवहार यावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सुनिल फुंडे होते. अतिथी म्हणून विभागीय उपनिबंधक सहकारी संस्थेचे एम.एम. देशकर, स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक रंजित दास, जे.पार्थसारथी, हरीहर शान, नाबार्डचे व्यवस्थापक अरविंद खापर्डे, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक संजय बरडे, सहायक निबंधक प्रदिप भानारकर, दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रदिप पाथरे व दुध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी फुंडे म्हणाले, जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक व शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक असून ज्या बँकेच्या भरोशावर जिल्ह्यातील दुध उत्पादक व शेतकरी ताठ मानेने जगत आहेत. त्याच शेतकऱ्यांना केंद्र शासनाने व राज्य शासनाने अडचणीत आणले. नोटाबंदीच्या नावाखाली सर्वत्र कॅशलेसचा व्यवहार सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांना व दुध उत्पादकांना पुरेसा पैसा पुरविण्यासाठी जिल्हा बँकेला पैसा मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्याला दररोज कामानिमित्त पैसा लागत असतो. त्याच्या खात्यात पैसा असतानादेखील पुर्ण पैशाचा सदुपयोग करता येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले. तर दुसरीकडे कॅशलेसचा धिंदोळा पिटणे हा कुठला न्याय, शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहार कसा समजणार असा प्रश्न करून त्यांच्या हक्काचा पैसा मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. प्रास्ताविक करण रामटेके यांनी तर आभार अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी मानले.(जिल्हा प्रतिनिधी)