'खुशी'ने फुलविली अंधांच्या जीवनात खुशी

By Admin | Updated: January 23, 2015 01:12 IST2015-01-23T01:12:56+5:302015-01-23T01:12:56+5:30

समाजात नेत्रदानाबद्दल अनेक भ्रामक गैसमज कायम असून अनेक शिक्षित लोकही मरणोत्तर नेत्रदानासाठी समोर येत नाही.

Joy in 'Bliss' Blindness Bliss | 'खुशी'ने फुलविली अंधांच्या जीवनात खुशी

'खुशी'ने फुलविली अंधांच्या जीवनात खुशी

विरली/बु. : समाजात नेत्रदानाबद्दल अनेक भ्रामक गैसमज कायम असून अनेक शिक्षित लोकही मरणोत्तर नेत्रदानासाठी समोर येत नाही. मात्र, येथील एका जोडप्याने आपल्या ६ वर्षीय चिमुकलीच्या निधनाच्या दु:खानंतरही तिचे नेत्रदान करून दोन अंधांच्या जीवनात आनंद फुलवून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
येथील खुशी सुरेश भेंडारकर (६) ही आपल्या आई-वडिलांची एकुलती एक़ ती पहिल्या वर्गात शिकत होती. हुशार असल्यामुळे शिक्षकांचीही लाडकी. मात्र, तिला जन्मत:च हृदयविकाराचा आजार असल्याने तिची प्रकृती चांगली राहात नव्हती. तिच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, ५ दिवसांपुर्वी तिची प्रकृती अधिकच ढासळली आणि २० जानेवारीला सकाळी ६ च्या सुमारास तिची प्राणज्योत मालविली.
खुशीच्या अकाली निधनामुळे तिच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र अशा बिकट परिस्थितीतही तिचे वडील सुरेश भेंडारकर आणि आई वैशाली यांनी एकमेकांना धीर देवून खुशीचे नेत्रदान करण्यासाठी होकार दिला.
येथील सामाजिक कार्यकर्ते उद्धव कोरे यांनी तिच्या आई-वडिलांना नेत्रदानाची कल्पना समजावून सांगितली. नागपूर येथील लता मंगेशकर नेत्रपेढीचे डॉ. राजेंद्र चौरागडे, डॉ. प्रकाश काळबांधे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोकाकूल वातावरणात नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करून तिचे नेत्रसंकलन केले.
याप्रसंगी उद्धव कोरे, सुनिल महावाडे, एकनाथ भेंडारकर, राजेश महावाडे, दिनेश भेंडारकर, प्रेमदास खोब्रागडे, सचिन भेंडारकर, सुधाकर भेंडारकर उपस्थित होते.
ग्रामायणचे ५३ वे नेत्रदान
गेल्या अनेक वर्षांपासून येथील ग्रामायण प्रतिष्ठान जीते जीते रक्तदान आणि जाते जाते नेत्रदान अशी घोषणा देवून या परिसरात रक्तदान व नेत्रदानाची चळवळ राबवित आहे.
खुशीच्या रूपाने या संस्थेने केलेले हे ५३ वे नेत्रदान ठरले आहे. निधनानंतर मृतकांच्या आप्तस्वकीयांना धीर देवून त्यांना नेत्रदानासाठी राजी करवून घेण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष उद्धव कोरे आणि त्यांचे कार्यकर्ते करीत आहे.
शाळेत खुशीला श्रद्धांजली
मरावे परी नेत्ररूपे उरावे, असा आदर्श देणाऱ्या खुशीला तिच्या आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळेत श्रद्धांजली देण्यात आली. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी नेत्रदानाबद्दल गावात जनजागृती आणि नेत्रदान करण्याची शपथ घेतली.

Web Title: Joy in 'Bliss' Blindness Bliss