जीवघेणा स्ट्रीट लाईटचा प्रवास
By Admin | Updated: August 10, 2015 00:22 IST2015-08-10T00:22:06+5:302015-08-10T00:22:06+5:30
जंगलव्याप्त भागात दावेझरी गाव असल्याने रात्री घराबाहेर पडताना वन्य प्राण्याची भीती नागरिकांत आहे.

जीवघेणा स्ट्रीट लाईटचा प्रवास
खांबाला बटन आणि बल्ब : विजेचा धक्का लागण्याची भीती
चुल्हाड/सिहोरा : जंगलव्याप्त भागात दावेझरी गाव असल्याने रात्री घराबाहेर पडताना वन्य प्राण्याची भीती नागरिकांत आहे. यामुळे चक्क विजेच्या खांबाला बल्ब आणि बटन लावण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात हा विजेचा प्रवास गावकऱ्यांना जीवघेणा ठरणार असल्याची भीती आहे.
सिहोरा परिसरातील जंगलात वन्य आणि हिंसक प्राण्यांचा मुक्त संचार आहे. या जंगललगत दावेझरी गावाचे वास्तव्य आहे. गावकऱ्यांना रात्री घराबाहेर निघताना वन्य प्राण्याची भीती आहे. गावात पथदिवे नसल्याने रात्री अंधारच अंधार राहत आहे. यामुळे गावकरी भयभीत आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी ग्रामसभेत हा गंभीर प्रश्न चर्चेला ठेवला आहे. या आशयाचे अनेक ठराव जिल्हा परिषदेला स्ट्रीट लाईट मंजुरीकरिता देण्यात आले आहेत. परंतु या प्रस्तावावर साधी चर्चा झाली नाही. ग्रामपंचायतला पत्रव्यवहार झालेला नाही. राज्य आणि केंद्र शासन स्मार्ट गावे करण्याची संकल्पना मांडत असताना विकासाचे अनेक प्रस्ताव थंडबस्त्यात गेले आहेत. बांधकामासाठी सगळीकडे बोंबा बोंब आहे. या गावात गावाला प्रकाशात ठेवणारी संकल्पना गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठेवण्यात आली आहे. त्याप्रमाणे संपूर्ण खांबाला बटन आणि बल्ब लावण्यात आले आहे. हे बटन आणि बल्ब सुरू करण्याची जबाबदारी वॉर्डातील काही नागरिकांची आहे.
सायंकाळ होताच बल्ब सुरू करण्यात येत आहेत तर पहाटे हे बल्ब बंद करण्यास गावकरी पुढाकार घेत आहे. जमिनीपासून ५ फुट उंच खांबाला बटन आणि तारांची जोडणी करण्यात आली आहे. लहान मुले तथा बालकांचे बटनला स्पर्श होणार नाही, अशी काळजी घेण्यात आली आहे. उन्हाळा आणि हिवाळा या ऋतुत हा प्रयोग जीवघेणा नसला तरी, ऐन पावसाळ्यात बल्बचे बटन सुरू करताना भिती निर्माण झाली आहे. पाऊस सुरू असतानाही गावाला प्रकाशात ठेवण्यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरू आहे. परंतु कुणी गंभीरतेने घेत नाही. सिहोरा परिसरातील अनेक गावात हाच प्रयोग अंमलात आणला जात आहे. या जीवघेणा प्रयोगात दोष जिल्हा परिषद की ग्रामपंचायतचा आहे हे कळेनासे झाले आहे. जिल्हा परिषदमध्ये दरवर्षी वाढीव स्ट्रीट लाईटचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या नियोजनाचा फायदा स्ट्रीट लाईट असणाऱ्या गावांना होत आहे. परंतु ज्या गावात आजवर स्ट्रीट लाईट पोहचली नाही अशा गावांना यात डच्चू देण्यात आले. सुकळी नकुल, गोंडीटोला गावे या सुविधेपासून वंचित आहेत. गावांना प्रकाशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गावकरी असे जीवघेणे स्ट्रीट लाईटचे प्रयोग करीत आहेत. यामुळे या गावात जिल्हा परिषद अंतर्गत तात्काळ स्ट्रीट लाईट मंजूर करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)