नोकरीही गेली अन् जीवही
By Admin | Updated: May 10, 2017 00:27 IST2017-05-10T00:27:34+5:302017-05-10T00:27:34+5:30
विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपले घरदार, शेती दिली त्या शेतकऱ्यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत.

नोकरीही गेली अन् जीवही
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपले घरदार, शेती दिली त्या शेतकऱ्यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. पाथरी येथील प्रकल्पग्रस्त जयेंद्र जानबा तागडे (४७) हा व्यक्ती मागील १० वर्षापासून गोसीखुर्द धरणावर कंत्राटी पद्धतीवर सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता.
दरम्यान, सोमवारला धरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणावरील सुरक्षा रक्षकाचे काम माथाडी बोर्डाला देऊन १५ लोकांना कामावरून कमी केले. यामध्ये जयेंद्र तागडे यांचा समावेश होता. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या जयेंद्रला याचा मानसिक धक्का बसून कालच हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रकल्पग्रस्त युवकाची नोकरी व जाण्याला व मृत्यूला जबाबदार असणाऱ्या धरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जयेंद्र तागडे हे धरणाच्या कामाकरिता सर्व शेती, घर गेले आता काहीही शिल्लक राहिले नाही. घरी पत्नी, दोन मुले, दोन मुली असा मोठा परिवार आहे. सर्व मुले शिक्षणाचे.
त्यामुळे प्रपंच चालवायला मोठी अडचण येत होती. अशातच १० वर्षापासूनगोसीखुर्द धरणावर कंत्राटदाराकडे सुरक्षा रक्षकाचे काम मिळाले. त्यामुळे संसार चालवायला थोडीफार मदत झाली. धरण विभागाचे अधिकारी या सुरक्षा रक्षकांना नेहमी खोटे आश्वासने देवून त्यांची दिशाभूल करीत आले आहेत. तुम्हाला कामावरून कोणत्याही परिस्थितीत कामावरून कमी केले जाणार नसल्याचे सांगितले गेले. शेवटच्या क्षणापर्यंत अधिकाऱ्यांची हीच भाषा होती. या जुन्या सुरक्षा रक्षकांना कालपर्यंत माथाडी बोर्डाचे कामगार घेणार असल्याचा थांगपत्ता लागू दिला नाही.
काल या सर्व जुन्या सुरक्षा रक्षकांना ही माहिती कळताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही बाब खातरजमा केली. जयेंद्र तागडे यांना ही माहिती कळताच त्यांच्या डोळ्यासमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या.
संपूर्ण शेती धरणात गेल्यामुळे कुटुंबाचे गाडे कसे चालवायचे? उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन जवळ नव्हते. संपूर्ण कुटुंबच जयेंद्रवर अवलंबून होते. त्यामुळे कामावर कमी केल्याचा मोठा मानसिक धक्का बसून त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांसमोर फार बिकट समस्या आली आहे. जयेंद्रच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या धरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.