झोडे, मेश्राम यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: September 7, 2016 00:37 IST2016-09-07T00:37:50+5:302016-09-07T00:37:50+5:30
राज्य शासनाने सन २०१५-१६ चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली.

झोडे, मेश्राम यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
जिल्ह्यातील दोघांची निवड : पारदर्शक प्रक्रियेतून निवड
भंडारा/जवाहरनगर : राज्य शासनाने सन २०१५-१६ चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली. यात जिल्ह्यातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे. लाखनी तालुक्यातील सेलोटी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक पुरुषोत्तम पुंडलिक झोडे व कोंढी-जवाहरनगर येथील ग्रामविकास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मनोहर मंगल मेश्राम यांचा यात समावेश आहे.
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगिण विकासाचा पाया आहे. समर्पीतवृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पितवृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी राज्य पुरस्काराने गौरविले जाते. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाद्वारे निवड करून जाहीर करण्यात आले. यावर्षी शासनाने आॅनलाईन पद्धतीने प्रस्ताव मागवून शिक्षकांची शैक्षणिक अर्हता, शिक्षकांनी लिहिलेले शैक्षणिक संशोधनपर निबंध, वृत्तपत्रात प्रकाशित किमान पाच वैचारिक लेख, शिकवीत असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यास कला, विज्ञान, वर्क्तृत्व या क्षेत्रातील प्राप्त पुरस्कार, शिक्षकाने स्वत: मिळवलेले विज्ञान प्रदर्शनीतील पुरस्कार शिक्षकाने स्वत: मिळवलेले क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार, शिक्षकाने केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी शासनाने दिलेले पुरस्कार, शिक्षकास अल्पबचत, कुटुंब कल्याण, जनगणना, पल्स पोलिओ, रक्तदान आदी राष्ट्रीय कार्यातील कार्यास प्राप्त पुरस्कार, शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मिळवलेली लोकवर्गणी, शिक्षकाने केलेले ग्रंथलेखन, पायाभूत चाचणीतील वर्गाची सरासरी श्रेणी, बालवाचन, ज्ञानरचनावाद, डिजीटल स्कुल, वाचनप्रेरणा, वर्षभरात वर्गातील, शाळेतील मुलांनी किमान किती पुस्तके वाचली, शिक्षकाने राबविलेले विविध उपक्रम आदी विविध क्षेत्रात शिक्षकाने केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन करण्यात आले.
विभागीय स्तरावरून वरील निकषात अधिकाधिक गुण प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील दोन पात्र शिक्षकांची निवड करून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली. त्यात शिक्षकांनी केलेल्या कार्याचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करण्यास सांगण्यात आले. तसेच शिक्षकांचा शैक्षणिक, सामाजिक दर्जा तसेच सामाजिक समता, समरसता, स्त्री पुरुष समानता याबाबत असलेली संवेदनशीलता व त्यासाठी केलेले विशेष प्रयत्न, राष्ट्रीय दृष्टीकोनाबाबद विचार व कार्य, उपक्रम तसेच शिक्षकाचे व्यक्तिमत्व विचारात घेऊन पारदर्शकतेने त्यांची पुरस्काराकरिता निवड करण्यात आली. (शहर प्रतिनिधी/वार्ताहर)