जवाहरनगर : ठाणा-जवाहरनगर रोड लगत असलेले ज्वेलर्सचे दुकान व शहापूर येथील पिपरी पुनर्वसन या ठिकाणी असलेले अतुल देवराव कावळे यांचे चैतन्य ज्वेलर्सचे दुकान शुक्रवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडले. यात १ लक्ष ९१ हजार ५०० रुपयांची सोने-चांदी किमतीची वस्तू अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ठाणा-जवाहरनगर रोडलगत आयुधी ज्वेलर्स येथील सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना चोरी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी डुंबरे ज्वेलर्स या दुकानावर मोर्चा वळविला. या ठिकाणी शटरला दोन कुलूप लावले होते. पैकी एक कुलूप सायरनचे असल्यामुळे त्यांना ते तोडता आले नाही. मात्र, पट्टी कापली गेली. दुसऱ्या बाजूचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, सीसीटीव्हीचे सयंत्र व दुकानासमोरील कॅमेऱ्याची तोडफोड केली. सीसीटीव्ही फुटेज असलेला रेकॉर्डिंगचा महत्त्वपूर्ण भाग व दुकानातील सोने-चांदी लंपास केले. दुसरीकडे शहापूरलगत पिंपरी पुनर्वसन येथील चैतन्य ज्वेलर्समधून तीन किलो चांदी, पाच ग्रॅम सोने व बेन्टेक्सचे सामान अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. असा एकंदरीत एक लक्ष ९१ हजार पाचशे किमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला. जवाहरनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे करीत आहेत.
ठाणा, पिपरी येथील ज्वेलर्सचे दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST