हरवलेल्या ‘जय’ चा जयचंद आला
By Admin | Updated: March 1, 2017 00:30 IST2017-03-01T00:30:04+5:302017-03-01T00:30:04+5:30
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जय नामक वाघ वर्षभरापूर्वी अचानकरित्या बेपत्ता झाला.

हरवलेल्या ‘जय’ चा जयचंद आला
वन्यप्रेमींमध्ये आनंद : ‘जय’च्या बेपत्ता होण्याचे दु:ख कायम
विशाल रणदिवे अड्याळ
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जय नामक वाघ वर्षभरापूर्वी अचानकरित्या बेपत्ता झाला. त्या वाघाचा मृत्यू झाल्याचे खासदार नाना पटोले यांनी सांगितल्यानंतर वनविभाग खडबडून जागा झाला होता. अड्याळजवळील पुरकाबोडी जंगलात ‘जय’सारखा दिसणारा वाघ दिसल्याचे बोलले गेले होते. त्यानंतर प्र्राणीमित्र व वनविभागाच्या चमुने जंगल पिंजून काढले. ठिकठिकाणी कॅमेरे लावले. पंरतु ‘जय’ कुठेही आढळून आला नाही.
त्यानंतर वनविभागाची महिनाभर शोधमोहीम सुरू राहिली. कुणालाही कोणताही वाघ दिसला तर तो ‘जय’ असावा. असे सांगत ‘जय’चा शोध व्हायचा. परंतु ना ‘जय’ दिसला ना त्याच्या पाऊलखुणा! जय जिवंत आहे की मृत पावला की त्याची शिकार झाली याबाबत आजही गूढ कायम आहे.
आता ‘जय’सारखाच हुबेहुब दिसणारा त्याचा अपत्य ‘जयचंद’ हा वाघ पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्याचा अधिवास पवनी वनक्षेत्रात अधिक असल्यामुळे पवनी गेटकडे पर्यटक तथा वन्यप्रेमीची गर्दी होऊ लागली आहे. काही वर्षापुर्वी उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात स्थलांतरीत झालेल्या ‘जय’ हा वाघ अल्पावधीत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘जय’ची ओळख ‘सेलीब्रेटी’सारखी झाल्यामुळे त्याला पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येत होते.
सर्वांनाच वेड लावणारा प्राणीमित्रांना आकर्षित करणारा, रूबाबदार शरीरयष्टीचा, उंचपुरा दिसणारा ‘जय’ नामक वाघ १६ एप्रिल २०१६ पासून अचानक बेपत्ता झाला आहे. त्याची शोधमोहीम अजुनही सुरुच असल्याचे वनविभाग सांगत असला तरी तो अद्याप कुणालाही दिसला नाही. ‘जय’ नामक वाघाचा जन्म साकोली तालुक्यातील नागझिरा अभयारण्यात झाला होता. ‘जय’चा भाऊ ‘विरू’ हा पेंच प्रकल्पात स्थलांतरीत झाला आहे. मध्यंतरी ‘जय’ तेलंगना राज्यातील कागजनगर, आदिलाबाद जंगलात गेल्याची चर्चा होती.
आता जय व चांदी (टी २) या वाघाचा अपत्य असलेल्या ‘जयंचद’ हा वाघ ‘जय’ची जागा घेण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील सहा महिन्यापासुन पवनी गेट परिसरात तो दृष्टीस पडत आहे. उमरेड वनक्षेत्रातून तो जुलै २०१६ मध्ये पवनी वनक्षेत्रात दाखल झाला. अडीच वर्षे वयाचा असलेला ‘जयचंद’ हा ‘जय’पेक्षाही रूबाबदार होईल, असे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.
२६ जानेवारी रोजी पवनी वनक्षेत्रात ‘जयचंद’ सह तीन वाघांनी पर्यटकांना दर्शन दिले होते. ‘जयचंद’च्या दर्शनामुळे प्राणीमित्रांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहे.
जयचंद नामक वाघ काही दिवसापूर्वी भुयार वनक्षेत्रात आढळून आला. हा वाघ ‘जय’सारखा म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा धिप्पाड होऊ शकतो. जयचंदमुळे पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे महसुलामध्ये वाढ होऊ शकते.
- डी. एन. बारई, वनपरिक्षेत्राधिकारी अड्याळ.