जांभळी गावाला आले छावण ीचे रुप
By Admin | Updated: November 4, 2014 22:35 IST2014-11-04T22:35:42+5:302014-11-04T22:35:42+5:30
मागील १५ दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीत जीवन जगत असलेल्या नागरिकांना आताही मोकळा श्वास घेता येत नाही. जराही शेतात किंवा घराबाहेर जायचे म्हटले की समोर दिसते ती बिबट्याची दहशत.

जांभळी गावाला आले छावण ीचे रुप
बिबट सापडेना : नागरिकांमध्ये भीती अन् संताप, २०० अधिकारी व कर्मचारी तैनात
संजय साठवणे - साकोली
मागील १५ दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीत जीवन जगत असलेल्या नागरिकांना आताही मोकळा श्वास घेता येत नाही. जराही शेतात किंवा घराबाहेर जायचे म्हटले की समोर दिसते ती बिबट्याची दहशत. एक महिला बिबट्याच्या शिकारीला बळी पडली. त्यामुळे नागरिक धास्तावले आहे. सध्या या गावात वनअधिकारी, कर्मचारी, पोलीस, राज्य राखीव दल असे २०० च्यावर कुमक लागली असून साकोली तालुक्यातील जांभळी (खांबा) या गावाला छावणीचे रुप आले आहे.
गावाची लोकसंख्या १२०० असून या गावात आताही एवढी दहशत आसहे की लोक शेतातही जायला घराबाहेर निघत नाही. जांभळी गाव हे नागझिरा व्याघ्रप्रकल्पाला लागले असून हे गाव वनविभाग साकोलीच्या हद्दीत येत असून गावाला लागलेले जंगल हे वन्यजीव विभाग नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या अखत्यारीत येते. गावाच्या सभोवताल जंगल व्यापलेले आहे. त्यामुळे एकंदरीतच परिसरात वन्यप्राण्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात नेहमीच असते.
गाव परिसरात वाघ, बिबट, अस्वल, हरिण यासह अन्य वन्यप्राणी नेहमीच दिसतात. हे या परिसरातील लोकांसाठी नवीन नाही. पण शेळ्यांची व माणसांची शिकार ही या परिसरातील पहिलीच घटना आहे.
या बिबट्याचे पूर्वी पंधरा वीस दिवसांपासून शेळ्या फस्त करण्याचे प्रकार सुरु केले. याची माहिती गावातीलच लोकांनी वनविभागाला दिली. यावेळी जर वनविभागाने या बिबटाला पकडण्यासाठी जर उपाययोजना केली असती तर कदाचित त्या वृद्ध महिलेचा जीव वाचविता आला असता.
वृद्ध महिलेच्या शिकारीपूर्वी साकोली वनविभागातर्फे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना या बिबट्याला जेरबंदी करण्याची परवानगी मागितली होती. मात्र प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी ही मागणी फेटाळली. परिणामी वनविभागाने ही कारवाई टाळली व महिलेला जीव गमवावा लागला. त्यामुळे वनविभागालाच या प्रकरणात दोषी ठरवून त्यांचेवरही कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही आता जोर धरत आहे.
मळाबाई बावणे या वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर वनविभाग जागा झाला. त्या दिवसापासून गावात बिबट पकडण्यासाठी पिंजरे मांडणे, वनकर्मचाऱ्यांची गस्त लावणे असे प्रकार सुरु झाले. सद्यस्थितीला या गाव परिसरात या बिबटला पकडण्यासाठी सहा पिंजरे लावण्यात आले.
या गावात एक सहायक वनसंरक्षक, दोन वनक्षेत्राधिकारी, आठ सहाय्यक वनक्षेत्राधिकारी, तुमसर, नाकाडोंगरी, लाखनी, लाखांदूर, साकोली यासह इतर ठिकाणचे असे एकूण २०० वनरक्षक, ५० वनमजूर व वन्यजीव विभागाचे दहा कर्मचारी असे एकूण २०० कर्मचारी या ठिकाणी गस्तीवर आहेत. मात्र हा बिबट आताही मोकळाच असून गावात मात्र कमालीची दहशत आहे.