‘जय’, ‘श्रीनिवास’ वनविभागाला मिळेना !
By Admin | Updated: July 24, 2016 00:26 IST2016-07-24T00:26:06+5:302016-07-24T00:26:06+5:30
भंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या उमरेड-कऱ्हांडला राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील जय व टी सिक्स या वाघीणीचा बछडा ‘श्रीनिवास’ नामक छावा लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात फिरत असल्याचे ...

‘जय’, ‘श्रीनिवास’ वनविभागाला मिळेना !
वनविभागाच्या शोधमोहिमेला यश येईना : जय नागझिऱ्यात तर गेला नसावा ना?, तीन महिन्यांपासून जय बेपत्ता!
भंडारा : भंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या उमरेड-कऱ्हांडला राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील जय व टी सिक्स या वाघीणीचा बछडा ‘श्रीनिवास’ नामक छावा लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात फिरत असल्याचे लोकेशन १५ जुलै रोजी वनविभागाला मिळाले. त्यानंतर वनविभागाने चौरास भागातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला असून वनविभागाने शोधमोहीम सुरू केली आहे.
साकोली : नागझिरा अभयारण्यात जन्मलेला व कालांतराने उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील गेलेला जय नामक बेपत्ता झाल्याने वनविभागाची त्रेधातिरपीट उडाली आहे. मात्र ‘जय’चा शोध घेत असतानाच जयचा छावा श्रीनिवास या वाघाचे लोकेशन लाखांदूर तालुक्यातील इटान नांदेड या भागात दिसुन आल्याने जय पुन्हा नागझिरा अभयारण्यात परत आला नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. मात्र या शोधमोहिमेत वनविभागाला यश आले नाही.
उमरेड कऱ्हांडल्यातील जय हा वाघ बेपत्ता झाल्यापासुन वनविभागाची संपुर्ण चमू त्याच्या शोधासाठी लागली आहे. त्याचे भ्रमणक्षेत्र उमरेडपासून ब्रम्हपुरी असल्याने वनविभागाचा शोध घेत आहेत. १९ मे रोजी ‘जय’चे लोकेशन ब्रम्हपुरी येथे दिसून आले होते. मात्र त्यानंतर तो बेपत्त्ता झाला. रेडीओ कॉलरही निष्क्रिय झाल्याने त्यांचा ठावठिकाणा लावणे कठीण झाले आहे. जयचा छावा श्रीनिवासचे १५ जुलै रोजी लाखादुर तालुक्यातील नांदेड इटान येथे असल्याची माहिती वनविभागाला मिळाली आहे. मात्र श्रीवासनचाही या जंगलात वा परिसरात दिसला नाही. ब्रम्हपुरी व लाखांदूर परिसरताील जंगलाला लागुनच नागझीरा व नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्प लागून असल्याने जय पुर्वीच्या ठिकााणावर म्हणजे नागझिरा जंगलात तर आला नसावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
लाखांदूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याला लागून आहे. या प्रकल्पातील जंगलाचा काहीभाग गोसेखुर्द धरणाला लागून भंडारा जिल्ह्यात येतो. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी लाखांदूर व पवनी तालुक्यात प्रवेश करतात. राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांच्या गळ्याला रेडीओ कॉलर बसवली जाते. नेमका तो प्राणी कुठल्या दिशेला व कोणत्या भागात आहे, याची अद्ययावत माहिती राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना असते. यातील ‘श्रीनिवास’ नामक छावा उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात नसून तो बाहेर गेल्याचे कळले. व्याघ्र प्रकल्पात माही नामक वाघीनीने ‘जय’ला जन्म दिला होता. त्यानंतर ‘जय’ने नागझिरा जंगल सोडून उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात प्रवेश केला होता.
उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात ‘जय’ होता. मजबुत शरीरयष्टी, दिमाखदार चाल आणि आकारमानाने मोठा असल्यामुळे ‘जय’ प्रसिद्धी झोतात आला. जयपासून एकूण ११ बछडे झाले असून त्यात सात नर आणि चार मादी आहेत. उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात जयसिंग, श्रीनिवास, व बिट्टू हे बछडे चर्चेत होते. यापैकी श्रीनिवास नामक छावा लाखांदूर तालुक्यातील ईटान व नांदेड शेतशिवारात असल्याचे रेडीओ कॉलरवरून व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना समजले. त्याआधारे लाखांदूर वनविभागाला सतर्क करण्यात आले. वनपरिक्षेत्राधिकारी रमेश दोनोडे यांनी चौरास भागात कर्मचाऱ्यांसोबत गस्त घालून गावकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. मात्र ‘श्रीनिवास’ कुणालाही दिसला नाही. मात्र त्या भागातील नागरिकांना वाघ दिसल्यास वनविभागाला माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे. यापुर्वी ‘जय’ तालुक्यातील अंतरगाव शिवारात असल्याचे रेडीओ कॉलरवरून कळले होते. त्यानंतर त्याचे लोकेशन सापडले. परंतु मागील दोन महिन्यांपासून ‘जय’ कुणालाही दिसला नसल्यामुळे व लोकेशन मिळत नसल्यामुळे वनविभाग ‘जय’च्या शोधात जंगल पिंजून काढत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
‘जय’ला सेलिब्रेटी बनविले?
‘वनविभागाने पर्यटनावर अधिक फोकस केल्यानंतर बाहेरून येणाऱ्या सेलिब्रेटींना ‘जय’ दाखविण्यासाठी वनविभाग आटापिटा करीत होता. अशातच अन्य वाघांकडे दुर्लक्ष झाल्याने ‘जय’वर कुणाची नजर पडली तर नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. यापूर्वी ‘राष्ट्रपती’ या ढाण्या वाघावर अधिक फोकस करण्यात आले होते. आता ‘राष्ट्रपती’ कुठे आहे वनविभागालाच माहित नाही.
‘जय’चा जन्म नागझिरा जंगलात
नागझिरा जंगलात माही या वाघिणीची जय व विरु ही छावे आहेत. या दोन्ही वाघांचा जन्म नागझिरा अभयारण्यात झाला होता. या जंगलात दोघेही दोन ते अडीच वर्षे होते. त्यानंतर विरु हा मध्यप्रदेशातील पेंच अभयारण्यात गेला तर जयचे उमरेड कऱ्हांडला स्थलातरण झाले. माही या वाघीनीचा एप्रिल महिन्यात नागझिरा अभयारण्यात मृत्यू झाला.
जय नेमका कुठे आहे याची निश्चित माहिती नाही तरीही नागझीरा नवेगावबांधच्या जंगल व परिसरातील जंगलात शोध घेणे सुरु आहे.
- आर. आर. सदगिरे,
सहायक वनसंरक्षक, नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प.
पवनी वनविभाग आणि वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी दोन दिवसांपासून ‘जय’च्या शोध मोहीमेवर आहे. जंगला लगतच्या गावांमधील नागरिकांच्या भेटी घेणे सुरू आहेत. वाघ दिसल्यास वनविभागाला सूचना द्या, असे सांगण्यात येत आहे.
डी. एन. बारई, वनपरिक्षेत्राधिकारी, पवनी
वनविभागाने पर्यटनावर भर देण्यापेक्षा वन्यजीव व्यवस्थापनावर भर देण्याची गरज आहे. एका वाघाला प्रसिद्ध करण्यापेक्षा प्रत्येक वाघांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
- कुंदन हाते, मानदवन्यजीव रक्षक नागपूर.