इसमाने घेतली वैनगंगेत उडी
By Admin | Updated: April 5, 2015 00:45 IST2015-04-05T00:45:11+5:302015-04-05T00:45:11+5:30
औषधोपचारासाठी पत्नीसह भंडारा येथील डॉक्टरकडे येत असताना एका इसमाने कारधा नदीच्या पात्रात उडी घेतली...

इसमाने घेतली वैनगंगेत उडी
कारधा पुलावरची घटना : पत्नीच्या तक्रारीवरुन शोध सुरू
भंडारा : औषधोपचारासाठी पत्नीसह भंडारा येथील डॉक्टरकडे येत असताना एका इसमाने कारधा नदीच्या पात्रात उडी घेतली. ही घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कारधा नदी पुलावर घडली.
लाखनी तालुक्यातील मुंडीपार (पिंपळगाव) येथील ईश्वदास मसाजी कांबळे (४५) असे उडी घेणाऱ्या इसमाचे नाव आहे. मानसिक आजाराने त्रासलेल्या ईश्वरवर नागपूर येथील डॉक्टरकडे औषधोपचार सुरू होते. प्रकृती सुधारत असल्याने त्याने औषधोपचार बंद केला होता. दरम्यान, त्याचा मानसिक आजार पुन्हा वाढल्यामुळे मागील काही दिवसापासून तो रात्रीच्यावेळेस झोपू शकत नव्हता. मानसीक आजार जळल्याने तो नेहमी चिडचिड करत असायचा. त्यामुळे पत्नीसह शनिवारला तो बसने भंडारा येथील डॉक्टरकडे उपचारासाठी येत होते.
दरम्यान, कारधा टोल नाक्यावर बस थांबल्यानंतर ईश्वरदासने बसमधून पळ काढला. त्याच्या पाठोपाठ पत्नी वंदनाही धावत सुटली. तिने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला मात्र तो थांबला नाही. कारधा गावातून तो सरळ नदीपुलावर आला. यावेळी त्याने शर्ट व चप्पल नदीच्या पुलावर काढून ठेवला. यानंतर त्याने नदीपात्रात उडी घेतली. दरम्यान मागून धावत आलेल्या पत्नीला पुलावर असलेल्या शर्ट व चप्पलवरून पतीने नदीत उडी घेतल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी घटनेची माहिती होताच कारधाचे ठाणेदार राजेश शेट्टे हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. स्थानिक मासेमारांच्या मदतीने नदीत उडी घेतलेल्या इसमाचा शोध घेण्यात आला. मात्र अंधार पडू लागल्यामुळे तो आढळून आला नाही. कारधा पोलिसांचे पथक शोधकार्यात लागले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता. (शहर प्रतिनिधी)