१२०० हेक्टरवर होणार सिंचन
By Admin | Updated: January 20, 2015 00:00 IST2015-01-20T00:00:47+5:302015-01-20T00:00:47+5:30
सांसद आदर्श दत्तक ग्राम बघेडा येथील कोरडा बघेडा जलाशय तथा कारली लघु प्रकल्प भरण्याचे निर्देश राज्याच्या जलसंधारण मंत्र्यांनी दिले. खासदार नाना पटोले यांनी जलसंधारणमंत्र्यांना

१२०० हेक्टरवर होणार सिंचन
तुमसर : सांसद आदर्श दत्तक ग्राम बघेडा येथील कोरडा बघेडा जलाशय तथा कारली लघु प्रकल्प भरण्याचे निर्देश राज्याच्या जलसंधारण मंत्र्यांनी दिले. खासदार नाना पटोले यांनी जलसंधारणमंत्र्यांना तशी सूचना केली होती. बघेडा जलाशय तुडूंब भरला असून सांसद दत्तक ग्रामची येथे प्रचिती येत आहे. या तलावावर विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांचा संचार वाढला असून उन्हाळी नियोजित सिंचन २५० हेक्टर व नियोजित १२०० हेक्टर सिंचन पुर्ण होईल.
सांसद दत्तक ग्राम करीता खासदार नाना पटोले यांनी तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा या नावाची निवड केली होती. या गावात ब्रिटीशकालीन बघेडा जलाशय आहे. या तलावाची सिंचन क्षमता १४९८ हेक्टर झाली आहे. नैसर्गिक पावसाने हा तलाव यावर्षी कमी भरला. लघु पाटबंधारे विभागाने सिंचनाकरिता शेतकऱ्यांना पाणी दिले होते. त्यामुळे या तलावात केवळ १७ टक्केच पाणी शिल्लक होते. उन्हाळी धानाकरिता पाणीच शिल्लक नव्हते. २० दिवसांपूर्वी बघेडा येथे खासदार नाना पटोले तथा सर्वच विभागातील विभागप्रमुखांची बैठक बोलाविली होती. तेव्हा ग्रामस्थांनी बघेडा जलाशयात बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. बावनथडी प्रकल्पात केवळ ४३ टक्के सध्या जलसाठा आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच प्रकल्पातून पाणी सोडण्याचा अधिकार आम्हाला नाही तो केवळ शासन स्तरावर निर्णय घेतला जातो अशी माहिती दिली. प्रक्ल्पातील ४३ टक्क्यापैकी केवळ २१ टक्के पाणीच महाराष्ट्राचे आहे. उर्वरित पाण्यावर मध्यप्रदेशाचा हक्क आहे.
खासदार पटोले यांनी राज्याचे जलसंधान मंत्री गिरीश महाजन यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बावनथडी प्रकल्पाचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्याची सूचना दिली. ना. गिरीश महाजन यांनी गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंताशी वैयक्तिक चर्चा केली. पत्रानुसार तसे निर्देशही दिले. बावनथडी प्रकल्पातून गुरुवारपासून पाणी सोडण्यात आले. रविवार सकाळपर्यंत बघेडा जलाशयात ४ दलघमी पाणी जमा झाले आहे. हा तलाव यामुळे तुडूंब भरला आहे. कारली जलाशयात येत्या चार दिवसात १.५० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. कारली जलाशयापर्यंत वितरीका तथा तांत्रिक अडचणी सध्या दूर करणे सुरु आहे.
बघेडा जलाशयाची सिंचन क्षमता १४८९ व कारली जलाशयाची सिंचन क्षमता २६० हेक्टर आहे. आंबागड तलावातही पाणी सोडण्याचे निर्देश खासदार पटोले यांनी दिले आहेत. या तलावाची सिंचन क्षमता २१० हेक्टर आहे. पाणी सोडण्याची परवानगी केवळ याच वर्षाकरिता आहे. असे पत्रात नमूद आहे. (तालुका प्रतिनिधी)