साहित्य, कला निर्मितीतून सृजनशीलतेचा अविष्कार
By Admin | Updated: January 17, 2016 00:25 IST2016-01-17T00:25:15+5:302016-01-17T00:25:15+5:30
अध्यापनात परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने नवीन काही आले की, अध्यापकांचा प्रथमत: नकारात्मक प्रतिसाद दिसतो.

साहित्य, कला निर्मितीतून सृजनशीलतेचा अविष्कार
मोहाडी बीट ठरले रोल मॉडल : ज्ञानरचनावाद अध्यापनाला प्रारंभ
राजू बांते मोहाडी
अध्यापनात परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने नवीन काही आले की, अध्यापकांचा प्रथमत: नकारात्मक प्रतिसाद दिसतो. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी शिक्षकांना तयार केले. ‘कुमठे बीट’वरून परतल्यानंतर मोहाडी बीटमध्ये साहित्य निर्मिती करण्याचा अविष्कार घडवून आणला.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने तब्बल सहा महिन्यानंतर प्रत्यक्षात व्हायला लागली आहे. कुमठे बीटची प्रेरणा घेऊन ज्ञान रचनावादावर अध्यापन कार्याची सुरुवात मोहाडी तालुक्यात झाली आहे. मोहाडी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांनी बीटमधील १६९ अध्यापकांना हाताशी धरुन अध्ययन साहित्य निर्मितीची कार्यशाळा मोहगावदेवी, मोहाडी, शिवनी येथे घेतली. त्यात इयत्ता पहिली ते पाचवी वर्गासाठी जिल्हा परिषदेच्या २९ शाळांमध्ये २,९०० अध्ययन साहित्याची निर्मिती शिक्षकांनी केली आहे.
यात शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा कलागुण अन् सृजनशिलतेचा अविष्कार होता. वाचन, लेखन, संख्याज्ञान, संख्यावर क्रिया या क्षमतांची संपादणूक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही याचा संकल्प मोहाडी तालुक्याने केला आहे. विद्यार्थ्यांचा अध्यापनात मन रममाण होण्यासाठी मोहाडी बीटमधील २९ जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये वर्गात अध्ययन प्रक्रियेसाठी विविध रंगाचा संच चढविण्यात आला आहे. त्याद्वारे आता प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मोहाडी तालुक्यात आठ केंद्रासाठी मोहाडी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड, जांब बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर गभणे, करडी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप गणवीर, वरठी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी विभावरी पडोळे अशा चार बीटची निर्मिती करुन शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
मोहाडी बीटमध्ये शिक्षकांचा संघ तयार करण्यात आला आहे. मोहाडी बीट तालुक्यासाठी रोल मॉडल तयार झाला आहे. मोहाडी बीटमधील राहिलेल्या उणिवा जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. या बीटमध्ये सजलेल्या शाळा व अध्ययन साहित्याची निर्मिती बघण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांना भेट देता यावी याचे नियोजन तयार करण्यात आले आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाला अंमल करण्याचे नवचैतन्य व स्फूरण कुमठे बीटाने दिले आहे. कुमठे बीटाच्या दौऱ्यानंतर शिक्षकांची चिंतन व प्रेरणा सभा घेऊन तालुक्यासाठी रोल मॉडल बनविले आहे. ज्ञानरचना वादावर साहित्य निर्मिती करण्यासाठी केंद्रप्रमुख तेजस्विनी देशमुख, केंद्रप्रमुख यांचा सक्रिय सहभागाने साहित्य निर्मितीची कार्यशाळा यशस्वी झाली.