‘अद्वैत तत्त्वज्ञान’ शंकराचार्यांनी हिंदू धर्माला दिलेली अमूल्य देणगी
By Admin | Updated: January 16, 2016 00:50 IST2016-01-16T00:50:10+5:302016-01-16T00:50:10+5:30
हिंदू धर्मावर होणारी वैचारिक आक्रमणे, अनेकधर मत आणि तत्कालीन तंत्र मंत्र साधनेचा अतिरेक अशा बिकट अवस्थेत ...

‘अद्वैत तत्त्वज्ञान’ शंकराचार्यांनी हिंदू धर्माला दिलेली अमूल्य देणगी
प्रवचनमाला : बहिरंगेश्वर मंदिरात श्रोत्यांची मांदीयाळी
भंडारा : हिंदू धर्मावर होणारी वैचारिक आक्रमणे, अनेकधर मत आणि तत्कालीन तंत्र मंत्र साधनेचा अतिरेक अशा बिकट अवस्थेत सापडलेल्या हिंदू धर्माला सुप्रतिष्ठित करण्यासाठी तसेच विशुद्ध स्वरूपाचे हिंदू तत्वज्ञान प्रस्थापित करण्याचे कार्य शंकराचार्यांनी केले. त्यांनी पुरस्कारलेली पंचायतन पूजा व अद्वैत तत्वज्ञान ही हिंदू धर्माला शंकराचार्यांनी दिलेली अमुल्य देणगी होय, असे प्रवचन हरिभाऊ निटूरकर महाराज (हैदराबाद) यांनी केले.
स्थानिक श्री बहिरंगेश्वर देवस्थानात महाराजांची प्रवचनमाला पार पडली. ‘श्रीमद आद्य शंकराचार्य चरित्र आणि वाड:मय’ असा प्रवचनाचा विषय होता.
निटुरकर महाराज म्हणाले, आद्य शंकराचार्यांचे आयुष्य अवघे ३२ वर्षांचे असले तरी त्यांचे चरित्र अगाध आहे. काही ठळक प्रसंगाचीच ओळख महाराजांनी प्रवचनातून करून दिली.
प्रवचनमालेचे प्रथम पुष्प गुंफण्यापूर्वी श्रींची विधीवत पूजा व स्वागत करण्यात आले. फाये यांनी शंकराचार्यांचे महिषासूर मर्दिनी स्त्रोत्र सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यानंतर प्रवचनाला प्रारंभ करण्यात आला.
निटुरकर महाराजांनी शंकराचार्यांच्या जन्मापूर्वी असलेली सामाजिक -धार्मिक स्थितीचे वर्णन सांगितले. आचार्य शंकरचार्य यांनी वयाच्या ४ थ्या वर्षी शास्त्र आणि वेदांचा अभ्यास केला. ८ व्या वर्षी त्यांनी सेवा दिलेले विषय, उपनिषदांचे ज्ञान आणि मंडन मिश्रा यांची भेट हा प्रसंग सांगितला.
प्रवचन मालेचे द्वितीय पुष्प गुंफण्यापूर्वी फाये आणि कुळकर्णी यांनी स्त्रोत्र गायन प्रस्तुत केले. मंडन मिश्रांशी झालेला संवाद व त्यांचे पराभूत होणे, त्यानंतर मंडन मिश्रा यांची पत्नी उभयभारती देवी यांचेशी झालेली चर्चा यांचे महाराजांनी विस्तारपूर्वक विवेचन केले. याच कालावधीत हस्तामलक व त्रोटकाचार्य यांचेशी आलेला संपर्क व त्यांनी ग्रहण केलेले शिष्यत्व हे वर्णन महाजारांनी केले.
प्रवचनाचे संचलन करताना डॉ. प्रदीप मेघरे यांनी, तीन दिवसाच्या प्रवचनातून शंकराचार्यांच्या चरित्र आणि वाड:मयाचे परिपूर्ण आकलन होणे शक्य नाही. त्यासाठी सप्ताहाचे आयोजन करावे लागेल, अशी श्रोत्यांची भावना व्यक्त केली. डॉ. कुकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रवचनाची सांगता श्रीपाद श्रीवल्लभांच्या पसायदान तथा प्रसाद वितरणाने करण्यात आली.
प्रवचन कार्यक्रमासाठी श्री बहिरंगेश्वर देवस्थान कमिटी, चेपे पंडित, डॉ. अरुण कुंभारे, डॉ. विवेक पत्की, मोहन ढगे, फाये, कुळकर्णी, डॉ. व्यवहारे, डॉ. वंदना कुकडे यासह मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)