संरक्षित वनातील शेतशिवारात अवैध लाकडांचा साठा
By Admin | Updated: January 22, 2015 00:38 IST2015-01-22T00:38:25+5:302015-01-22T00:38:25+5:30
वन संवर्धनासोबत वृक्ष लागवड आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी शासनस्तरावरुन जनजागृती करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात ४५ ते ५० वर्षे जुन्या झाडांची कत्तल करून

संरक्षित वनातील शेतशिवारात अवैध लाकडांचा साठा
तुमसर : वन संवर्धनासोबत वृक्ष लागवड आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी शासनस्तरावरुन जनजागृती करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात ४५ ते ५० वर्षे जुन्या झाडांची कत्तल करून ही लाकडे वनालगतच्या शेतात ठेवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना हाताशी धरून झाडे कापणे व नंतर विकण्याचा गोरखधंदा तुमसर तालुक्यात सुरु आहे.
तुमसर वनपरिक्षेत्रातंगर्तत येणाऱ्या बपेरा वनक्षेत्रात चांदपूर - गोबरवाही मार्गावर खैरटोला या गावातील आंबा, मोहफुल, पळस, जांभुळ, भेरा, सालई, मोही, कसई, लिंब, जयमोहर प्रजातीची जवळपास १५० झाडे कापून ठेवली आहेत. ही झाडे सुमारे ४० ते ५० वर्षे जुनी आहेत. याची लांबी एक ते सात फूट व व्यास ५ ते ६ फूट इतका आहे. ही झाडे हातआरीने आणि कुऱ्हाडीने कापण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील ही झाडे कापण्यात आली आहेत. खैरटोला येथे सुमारे २० ते २५ घरे आहेत. या घरामागे ही झाडे होती. महसूल विभागाची यावर देखरेख असते. गावाला लागून व रस्त्याशेजारी तुमसर वनपरिक्षेत्राची सीमा प्रारंभ होते. बपेरा वनअंतर्गत हा संपूर्ण परिसर येतो. घनदाट जंगल परिसर असल्याने राखीव व संरक्षित वनाच्या सुमा येथून हाकेच्या अंतरावर आहे.
मोहाडी खापा शिवारात थेरकर टोली आहे. येथील शेतात ४० ते ५० वर्षांची जुनी झाडे कापण्यात आली. सध्या ही झाडे शेतात पडून आहेत. ही झाडे महाकाय दिसतात. आंजन जातीची ही झाडे आहेत. शेतातील झाडांवर शेतकऱ्यांचा अधिकार आहे. परंतु ती कापण्यापूर्वी उपविभागीय अधिकारी, वनविभागाची परवानगी रितसर घेण्याची गरज आहे. परंतु, तसे करण्यात आलेले नाही.
या परिसरात मागील अनेक महिन्यांपासून शेतशिवारातील झाडे कापून त्याचे लहान तुकडे करणे व विक्री करणारी टोळी सक्रीय आहे. या टोळीवर अंकुश लावण्याची गरज आहे. नियमबाह्य वृक्षतोड करणाऱ्यांना लगाम कोण लावेल हा मुख्य प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)