अवैध औषधसाठा; जप्तीची कारवाई
By Admin | Updated: August 1, 2016 00:13 IST2016-08-01T00:13:36+5:302016-08-01T00:13:36+5:30
रूग्णसेवा करताना बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर रूग्णांना अॅलोपॅथीक औषध देत असल्याची तक्रार होती.

अवैध औषधसाठा; जप्तीची कारवाई
मुजबी येथील प्रकरण : अन्न, औषध प्रशासनाची कारवाई
भंडारा : रूग्णसेवा करताना बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर रूग्णांना अॅलोपॅथीक औषध देत असल्याची तक्रार होती. यावरून भंडारा अन्न व औषध प्रशासन विभागाने डॉक्टरच्या क्लिनीकवर छापा घालून ८३ हजारांचा अवैध औषधसाठा जप्त केला. ही कारवाई मंगळवारला तालुक्यातील मुजबी येथे करण्यात आली.
मुजबी येथील डॉ. राजेश वैद्य हे बीएचएमएस पदवीधारक आहेत. त्यांनी मुजबी येथे श्री क्लिनीक थाटून रूग्णसेवा सुरू केली आहे. डॉ. वैद्य हे औषधोपचारासाठी रूग्णांना अॅलोपॅथीक औषध देत होते. अॅलोपॅथीक औषध देण्याची परवानगी त्यांना नसतानाही रूग्णांना अधिक किंमतीत अॅलोपॅथीक औषध देत असल्याची तक्रार भंडारा येथील अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाली.
यावरून सदर विभागाच्या पथकाने ४ मे ला श्री क्लिनीकवर छापा घातला असता मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथीक औषधसाठा आढळून आला. तो प्रतिबंधीत करून औषधांच्या खरेदीचे बील सादर करण्याचे निर्देश डॉ. वैद्य यांना देण्यात आले होते. मात्र, दिलेल्या कालावधीत डॉ. वैद्य यांनी औषध खरेदीचे बील सादर केले नाही.
औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० नुसार औषध साठवणुक व औषध विक्री नियंत्रीत केले जाते. कोणतेही परवानाधारक किंवा डॉक्टर यांनी योग्य त्या औषध परवानाधारकाकडून योग्य त्या बिलाने औषध खरेदी करणे अनिवार्य आहे. असे असतानाही डॉ. वैद्य यांनी अवैध औषधसाठा बाळगला. त्यामुळे सहायक आयुक्त डी. आर. गहाणे यांच्या मार्गदर्शनात औषध निरीक्षक प्रशांत रामटेके, मनिष गोतमारे यांनी २६ जुलैला श्री क्लिनीकवर छापा घालून ८३ हजारांचा औषधसाठा जप्त केला. याप्रकरणी डॉ. वैद्य यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी यासाठी न्यायालयात खटला दाखल करणार असल्याची माहिती सदर विभागाने दिली आहे. (शहर प्रतिनिधी)
सर्व अधिकृत डॉक्टरांनी परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून औषध खरेदी करावी. एमआर मार्फत खरेदी केलेल्या औषधींची बील घेवे.
- डी. आर. गहाणे
सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, भंडारा.