पोलिसांच्या रडारवर आंतरराज्यीय टोळी
By Admin | Updated: April 5, 2015 00:46 IST2015-04-05T00:46:07+5:302015-04-05T00:46:07+5:30
उन्हाळा सुरू झाला की, तुमसरात घरफोड्यांचे सत्र सुरू होते. घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी मागील दोन वर्षापासून सक्रीय आहे.

पोलिसांच्या रडारवर आंतरराज्यीय टोळी
घरफोडीत वाढ : चारचाकींचा करतात वापर
तुमसर : उन्हाळा सुरू झाला की, तुमसरात घरफोड्यांचे सत्र सुरू होते. घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी मागील दोन वर्षापासून सक्रीय आहे. यावर्षी आंतरराज्यीय घरफोटी टोळी पोलीस विभागाच्या रडारवर आहे. पोलीसांनी मोर्चेबांधणी केली आहे. सध्या या टोळीचे लोकेशन आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशात असल्याचे समजते.
तुमसर शहरात दिवाळीत तथा उन्हाळ्यात घरफोड्या वाढतात. टोळीने शहर तथा परिसरात उच्छाद मांडला, परंतु टोळीचा सुगावा लागला नाही. या टोळीचे मुख्य लक्ष्य शहराबाहेरील घरे असतात. उन्हाळ्यात शिक्षक वर्गासह इतर कर्मचारी सुट्या घेवून गावाकडे तथा भ्रमंतीकरिता बाहेर जातात. या संधीचा फायदा ही टोळी घेते. या टोळीत चार ते सहा जणांचा समावेश आहे. चारचाकीचा उपयोग ही टोळी करते. सामान्यत: मोठी घरे साधन संपन्न असतात. त्यामुळे ती या टोळीची प्रमुख टार्गेट असतात.
मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशासह राज्यातील अन्य शहरात टोळीचे सध्या लोकेशन प्राप्त होत आहे. मागील चोरी प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अट्टल घरफोड्यांना तुमसर पोलीस घेवून आली होती. चौकशीअंती त्यांनी भंडारा येथे चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे घरफोड्यांचे तार आंतरराज्यीय टोळीशी असल्याचे मानले जात आहे. पोलिसांच्या रडारवर ही टोळी आहे. ही आंतरराज्यीय टोळी रात्री १ ते ३ दरम्यान घरफोड्या करून पसार होते, अशी माहिती आहे. या दरम्यानच पोलीस मोर्चेबांधणी करण्याच्या विचारात आहे. तुमसर पोलिस आवाहन स्विकारल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)