आंतरराष्ट्रीय योग दिनाला उपस्थिती अनिवार्य
By Admin | Updated: June 16, 2015 00:39 IST2015-06-16T00:39:07+5:302015-06-16T00:39:07+5:30
राज्यातील सर्व शाळामध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ..

आंतरराष्ट्रीय योग दिनाला उपस्थिती अनिवार्य
योग दिनाचे आदेश धडकले
शाळेचा पहिला टोला २६ जूनला, सकाळी ७.३० वाजतापासून सुरुवात
संजय साठवणे साकोली
राज्यातील सर्व शाळामध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला असला तरी विदर्भात मात्र २६ जूनला शाळा उघडणार असल्यामुळे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ हा कार्यक्रम केवळ औपचारीक ठरणार असल्याचे चित्र आहे. शिक्षणमंत्र्यांनी विदर्भासाठी योगदिन ऐच्छीक ठेवला असला तरी शिक्षण विभागाने मात्र योग शिक्षणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा दिवस २१ जुनलाच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेशही पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे.
२१ जुनला रविवार असून शाळा २६ जुनला सुरू होणार असले तरी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सकाळी ७ ते ७.३० या वेळात हजर राहणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे ही एक दिवसाची सुटी पुढील सत्रात समाविष्ठ होऊ शकते. सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक व गटविकास अधिकाऱ्यांना या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
विदर्भातील अकरा जिल्ह्यातील ४० हजार शाळांमधून ६० लाख विद्यार्थी योग महोत्सवात सहभागी होण्याची शिक्षण विभागाची अपेक्षा असली तरी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिनाला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत संभ्रम आहे.
भारतीय योग विद्येचे महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्रानी २१ जून हा दिवस ‘अंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला आहे. शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योगविद्या महत्त्वाची असल्यामुळे राज्यात शालेय अभ्यासक्रमात योगाभ्यास सुरू करण्यात आला आहे.
२१ जुनला राज्यभरातील शाळामध्ये योगदिन कसा साजरा करावा, योग महोत्सवाचे महत्त्व अभ्यासक्रमेत्तर उपक्रम सुचविणे आणि नियोजन करण्यासाठी राज्यस्तरावर समिती गठित केली आहे. या समितीचे निमंत्रकपद मुंबईच्या समर्थ व्यायाम मंदिराचे उदय देशपांडे यांना देण्यात आले आहे.
राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक, क्रीडा विभागाचे सहसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधक व प्रशिक्षण परिषदेशिवाय नाशिकचे विश्वास मंडले, अमरावतीचे डॉ. विनय देशमुख, अरुण खोडसकर, नागपुरचे राम खांडवे, मुंबईचे अभय बापट, लोणावळ्याचे सुबोध तिवारी, आसगावचे भास्कर कुळकर्णी, अभिनेत्री मनिषा कोईराला, न्या.अंबादास जोशी, प्रमोद निफाडकर, अभिजित भोसले, डॉ. अजित ओक, गंगाधर मंडलीक, पल्लवी कव्हाणे, दीपिका कोठारी, दीपक घुमे आदी २४ सदस्यांचा नियोजन समितीत समावेश आहे.
साकोलीतील १५५ शाळेत कार्यक्रम
३१ जून हा योगदिवस साजरा करण्याचे शासनाचे पत्रक आले असून योग दिनाला शिक्षक व विद्यार्थ्यांना हजर राहण्याची सूचना केंद्रप्रमुखामार्फत दिली असून साकोली तालुक्यात १५५ शाळा असून यात एकूण २० ते २२ हजार विद्यार्थी आहेत. या सर्वांच्या उपस्थित योगदिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी जी.के. फटींग यांनी ‘लोकमत’ला दिली.
१९० देशात होणार साजरा
या आंतरराष्ट्रीय योग दिनाकडे जगाच्या नजरा लागलेल्या आहेत. हा योगदिन देशातील १९० देशातील २५० राष्ट्रामध्ये साजरा होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक महिन्यापासून तयारी सुरू आहे.