बंधारा बांधकाम थांबविण्याचे निर्देश
By Admin | Updated: February 17, 2015 01:07 IST2015-02-17T01:07:31+5:302015-02-17T01:07:31+5:30
भंडारा : साकोली तालुक्यातील शिवणीबांध येथील नाल्यावर बंधारा बांधण्यात येत आहे.

बंधारा बांधकाम थांबविण्याचे निर्देश
कार्यकारी अभियंत्याचे पत्र: दोषींवर कारवाईचे संकेत
भंडारा : साकोली तालुक्यातील शिवणीबांध येथील नाल्यावर बंधारा बांधण्यात येत आहे. हे बांधकाम चुकीच्या ठिकाणी करण्यात येत असल्याचे वृत्त लोकमतने रविवारच्या अंकात प्रकाशित केले. याबाबत कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे यांनी सदर बांधकाम थांबविण्याचे पत्र उप विभागीय अभियंत्याला दिले आहे.
लाखनी तालुक्यातील कटंगधरा येथील काही शेतकऱ्यांची शेती सकोली तालुक्यातील शिवणीबांध साखरा शिवरात आहे. येथून जवळूनच शिवणीबांध नाला वाहतो. यामुळे शेती बुडीत राहते. याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला आहे. अशी स्थिती असताना या नाल्यावर बंधारा मंजूर करून त्याचे बांधकाम सुरू केले. याची तक्रार काही शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना केली व लोकमतजवळ कौफियत मांडली. याबाबत लोकमतने १५ फेबु्रवारीच्या अंकात 'बंधारा बाधू द्या, मग फोडा!अधिकाऱ्याचे सुतोवाच' या शिर्षकाचे वृत्त प्रकाशित केले.
याबाबत लघु पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एच. गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, बंधारा बांधकामाला विरोध असल्याच्या तक्रारीचे निवेदन काही शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी उदय बोरकर यांनी कार्यालयाला दिले. यावरून उप विभागीय अभियंता पी. आर. धुर्वे यांना तात्काळ बांधकाम बंद करण्याचे पत्र दिल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
निर्माणाधीन बंधारा परिसरातील शेती बुडीत क्षेत्रात येत असल्यास ग्रामपंचायतीने चुकीचा निर्णय व ठराव कसा घेतला याची चौकशी होणे गरजेचे आहे. यात जे दोषी आढळून येईल त्यांच्यावर कारवाई होईल. स्वार्थासाठी कोणी चुकीची तक्रार दिली असेल तर शासनाची दिशाभूल व कर्मचाऱ्याची बदनामी करण्यासाठी तक्रार दिल्यासंबंधात अशा तक्रारदारावर फौजदारी कारवाईची मागणी करणार आहे. बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेऊ.
- आर. एच. गुप्ता,
कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद भंडारा.
शेतकऱ्यांसाठी हरितक्रांती करण्यासाठी साठवण बंधारा मंजूर करण्यात आला. बांधकाम ग्रामपंचायत करीत आहे. पाणी साठवण झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल. शेती बुडीत होऊ नये म्हणून नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे अडचण निर्माण होणार नाही.
- रामकृष्ण चांदेवार,
सरपंच, शिवणीबांध.