चांदपूर जलाशयातून ‘ती’ बोट हलविण्याचे निर्देश
By Admin | Updated: February 16, 2016 00:44 IST2016-02-16T00:44:14+5:302016-02-16T00:44:14+5:30
चांदपूर जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु केल्याप्रकरणी पाटबंधारे विभागाने मत्स्यपालन संस्थेचे अध्यक्ष शांताराम शहारे यांना नोटीस बजावली आहे.

चांदपूर जलाशयातून ‘ती’ बोट हलविण्याचे निर्देश
मासोळी उत्पादनाचे कंत्राट रद्द होणार : लघु पाटबंधारे विभागाचा दुसऱ्यांदा नोटीस
रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)
चांदपूर जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु केल्याप्रकरणी पाटबंधारे विभागाने मत्स्यपालन संस्थेचे अध्यक्ष शांताराम शहारे यांना नोटीस बजावली आहे. याशिवाय जलाशयातून अनधिकृत बोट हटविण्याचे निर्देश देण्यात आले असून अध्यक्षांनी असहकार्याची भूमिका घेतली आहे.
अनधिकृत बोटींग व्यवसाय प्रकरणी सिहोरा पोलीस ठाण्यांतर्गत मागासवर्गीय बहुउद्देशिय मत्स्यपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष शांताराम शहारे व अन्य आठ संचालकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. जलाशयात बोटिंग व्यवसायाला प्रशासनाची मंजुरी नसताना व्यवसाय सुरु झाला आहे. त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून १४९ कलमान्वये नोटीस बजावली आहे.
३२८ हेक्टर जागेतील या जलाशयाची खोली ३७ फुट आहे. जलाशयात मासोळी उत्पादन, मासेमारी व जलाशयाचे संवर्धन या आधारे मागासवर्गीय बहुउद्देशिय मत्स्यपालन सहकारी संस्थेला लिजवर देण्यात आले. या व्यवसायाकरिता डोंग्याचा उपयोग करण्याची तरतूद आहे. परंतु मागील सहा महिन्यापासून डोंगा पर्यटकांच्या भ्रमंतीकरीता सुरू आहे.
या डोंग्याला डिझेल इंजिन लावण्याची मंजुरी नसताना लाकडी डोंग्याला बोट तयार करण्यात आली. प्रती व्यक्ती ३० रूपये आकारणी होत असून पर्यटकांच्या जीवाचा खेळ राजरोसपणे मांडला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने मांडले आहे. वृत्त प्रकाशित होताच पाटबंधारे विभागाने मत्स्यपालन संस्थेचे अध्यक्ष शांताराम शहारे यांना नोटीस बजावली. जलाशयातून डिझेल इंजिन लावण्यात आलेला डोंगा हटविण्याचे निर्देश दिले आहे. परंतु डोंगा हटविण्याची तसदी घेतली नाही.
मसोळी उत्पादन व मासेमारी करण्यासाठी जलाशयाचे लिजवर कंत्राट देण्यात आले आहे. यात जलाशयाचे संवर्धन करण्याची तरतूद आहे. परंतु पाटबंधारे विभागाने डोंगा असलेली बोट जप्त करण्याची कारवाई केली नाही. या विभागात जप्तीची कारवाईकरीता लागणारा निधी व मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
प्रभारी शाखा अभियंते, रिक्त पदे यामुळे जलाशयावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अपुरी पडत आहे. जलाशयावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचारी नाही. तुर्तास बोटींग व्यवसाय बंद करण्यात आला असला तरी अनधिकृत बोट जलाशयात ठेवण्यात आली आहे.
जलाशयात मासोळी उत्पादन, मासेमारी व जलाशयाचे संवर्धनासाठी लीजवर देण्यात आले आहे. अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु करण्यात आल्याने डिझेल इंजिन लावण्यात आलेला डोंगा हटविण्याचे निर्देश दिले आहे.
- वाईन देशकर,
शाखा अभियंता सिहोरा
जलाशयात मासेमारी करण्यासाठी डोंग्याचा उपयोग केला जातो. यामुळे डोंगा जलाशयात ठेवला असून हटविण्याचा प्रश्नच येत नाही.
- शांताराम शहारे,
अध्यक्ष मत्स्यपालन संस्था चांदपूर.