मृत्यूनंतरही दिली जग पाहण्याची प्रेरणा
By Admin | Updated: May 26, 2017 01:58 IST2017-05-26T01:58:43+5:302017-05-26T01:58:43+5:30
नेत्रदानाने अंध व्यक्तीला जग पुन्हा पाहता येऊ शकते. या उदात्त हेतूने मृत्यूनंतर कुणाला जग पाहता यावे यासाठी

मृत्यूनंतरही दिली जग पाहण्याची प्रेरणा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नेत्रदानाने अंध व्यक्तीला जग पुन्हा पाहता येऊ शकते. या उदात्त हेतूने मृत्यूनंतर कुणाला जग पाहता यावे यासाठी नेत्रदान करण्याचा संकल्प लाला लजपतराय वॉर्डातील रहिवासी विश्वनाथ रामटेके यांनी केला होता. दरम्यान त्यांचे २३ मे रोजी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने मृत्यूनंतरही दोन जणांना जग पाहता येणार आहे.
समता नगर फेज वन येथील रहिवासी असलेले विश्वनाथ दासीकराम रामटेके हे जलसंपदा विभागात तांत्रिक कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे २३ मे रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात नागपूर येथील सूरज आय इन्स्टीट्युटने नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी डॉ.सोनल पराते, डॉ.गणेश आंबेकर यांची उपस्थिती होती. रामटेके यांच्या नेत्रदानामुळे समाजासमोर नेत्रदानाविषयी जागरुकता वाढेल यात शंका नाही. या संदर्भात नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. नेत्रदानाच्या कार्यासाठी रामटेके कुटुंबातील सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे रामटेके यांच्या अंत्यविधीनंतर पार पाडला जाणारा धार्मिक विधी न करता त्याची रक्कम बौद्ध विहाराला दान केली जाणार आहे. यासाठी वैशाली रामटेके, रिषीन रामटेके, अश्विनी रामटेके, अस्मिता रामटेके, राजेश गजभिये, अजीत मेश्राम, प्रभाकर रामटेके यांच्यासह कुटुंबातील सदस्य प्रयत्नरत आहेत.