रोवणी यंत्राच्या प्रात्यक्षिकाची पाहणी
By Admin | Updated: July 26, 2014 23:58 IST2014-07-26T23:58:00+5:302014-07-26T23:58:00+5:30
आत्मा भंडारा व तालुका कृषी अधिकारी तसेच मंडळ कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मशीन यंत्राद्वारे रोवणीचे प्रात्यक्षिक निलज खुर्द येथील शेतकरी मदनपाल भोयर यांचे शेतावर झाले.

रोवणी यंत्राच्या प्रात्यक्षिकाची पाहणी
युवराज गोमासे - करडी(पालोरा)
आत्मा भंडारा व तालुका कृषी अधिकारी तसेच मंडळ कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मशीन यंत्राद्वारे रोवणीचे प्रात्यक्षिक निलज खुर्द येथील शेतकरी मदनपाल भोयर यांचे शेतावर झाले. करडी मोहगाव रोड लगतच्या शेतावर दाखविण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाचा लाभ करडी परिसर आणि तुमसर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी घेतला. प्रती दिवस ३ एकर शेतीची रोवणी करण्याची क्षमता मशनीची असल्याची माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.
प्रात्यक्षिकाचेवेळी मोहाडी पंचायत समिती उपसभापती उपेश बांते, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष वासूदेव बांते, निलज खुर्दचे सरपंच संजय भोयर, मोहाडी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, तुमसर तालुका कृषी अधिकारी दौलत गभणे, मंडळ कृषी अधिकारी एन.के. चांदेवार, युवराज गोमासे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोवणी करणारी मशीन तयार झाल्याने शेतकऱ्याची वेळ, श्रम व पैशाची बचत होईल. शेतकऱ्यांना रोवणीसाठी मजूर गोळा करण्याची मेहनत कमी होईल. कृषी विभागाकडून भात रोवणीची मशीन अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेतकऱ्यांनी भात पिकाची रोवणी करण्यासाठी पारंपारिक पद्धत सोडून आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घ्यावी. मशीनने रोवणी करण्याची पद्धत सहज व सोपी आहे. रोवणी करण्यासाठी मजुरांची संख्या ४ ते ५ लागते.
रोपवाटीकेसाठीही जागा कमी लागते. बियाणे सुद्धा कमी लागतात. दोन ओळीमधील अंतरही एकसमान राखता येते. कुटूंबातील सदस्यांकडूनही रोवणी करता येवू शकते. मानवी श्रमाची बचत होवून रोवणीचा खर्च कमी होतो, तेव्हा यांत्रिकीपद्धतीचा वापर करावा, असे आवाहनही कृषी विभागाचे वतीने करण्यात आले. प्रात्यक्षिकासाठी आत्माचे बोरकर, कृषी सहायक विश्वनाथ कवासे, सचिंद्र रंगारी, प्रिती डुकरे व शेतकरी मदनपाल भोयर यांनी सहकार्य केले.
रोप नर्सरी तयार करण्याची पद्धत
सर्वप्रथम खळे, गोटे मुक्त चिखल तयार करावे, प्लॉस्टिक अंथरूणावर चिखल साच्यांमध्ये टाकावे, त्यावर अंकुरित धान्य टाकल्यानंतर ते गांडूळ खताने झाकावे अशा पद्धतीने तयार झालेले १६ ते १८ दिवसाची रोपे मशीनने रोवणीसाठी वापरावे. एकरी १० किलो धान्य पुरेशे ठरतात. मशीनसाठी साचेबंद असलेले पऱ्यांचे १८० केक लागतात.